‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे ‘माता-पिता हे देवासमान आहेत’, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडील व गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’, असे `मनूस्मृती’ या ग्रंथात म्हटले आहे.
भक्त पुंडलीकाने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्चर्याच होती पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्याच्यावर प्रसन्न झाला होता.
श्रावणबाळाने आपल्या अंध आई-वडिलांची सेवा न थकता सतत केली. वृद्ध आई-वडिलांनी काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेच त्यांना कावडीत (काठीला तराजूसारख्या दोन टोपल्या लावून त्यात) बसवले आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला पायी जायला निघाला.
मुलांनो, पुंडलिक आणि श्रावणबाळा यांचा आदर्श समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा-शुश्रुषा करणे, हे आपले कर्तव्यच आहे.
१. आई-वडिलांची सेवा मनापासून करण्याचे फळ
‘आई-वडील आणि गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.
तव प्रीतिर्भवेद्देवि परबह्म प्रसीदति ।।
अर्थ : भगवान शंकर म्हणतात, ‘‘हे पार्वती, आई-वडिलांना संतुष्ट करणार्या जिवावर तुझी कृपा होते. अशा जिवावर परब्रह्मही प्रसन्न होते.’’
२. आई-वडिलांना कधीच दुखवू नये
आई-वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात. मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे यांसाठी ते प्रयत्न करतात; परंतु काही मुले आई-वडिलांना उलट बोलतात. त्यामुळे आई-वडिलांचे मन दुखावले जाते. मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई-वडील दुखावले गेले, तर ते देवालाच दुखावल्यासारखे होते. मुलांनो, हे टाळण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ रहावे.
३. आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐकावे
आई मुलांच्या आवडी-निवडीनुसार खाद्यपदार्थ बनवते, तसेच मुलांना काय हवे-नको ते लक्षपूर्वक बघते. आजारपणात त्यांची रात्रंदिवस प्रसंगी जागरण करूनही काळजी घेते. हे सर्व करत असतांना ती स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही. तिच्या डोक्यात सतत मुलांचाच विचार असतो. वडीलही मुलांच्या सर्व आवश्यकता पुरवण्यासाठी आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कष्ट करून पैसे मिळवतात. जे लागेल ते मुलांना आणून देतात. असे असतांना मुलांनी ‘आपण आई-वडिलांचे मनापासून ऐकतो का’, याचा विचार करायला हवा.
मुलांनो, खरेतर आई-वडिलांची कितीही सेवा केली, तरी त्यांचे ऋण फिटू शकणार नाही. आई-वडिलांच्या ऋणातून थोडेतरी मुक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलेले मनापासून ऐकावे, तसेच त्यांच्याशी नेहमीच आदराने बोलावे.
४. आई-वडिलांवरील प्रेम कृतीतूनही व्यक्त करावे
मुलांचे आई-वडिलांवर प्रेम असतेच; पण ते प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे. मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्त झाल्यावर आई-वडिलांनाही आनंद होतो. उदाहरण म्हणून अशा काही कृती पुढे देत आहोत.
अ. आई-वडील बाहेरून घरी आले की, तुमच्यापैकी किती जण त्यांनी न मागता पाणी आणून देतात ? पाणी मागितल्यावरसुद्धा किती जण आईला ‘काय ग ? घे ना तुझे तू’, असे उलट बोलतात ? मुलांनो, असे बोलणे अयोग्य आहे. आई-वडील बाहेरून दमून आलेले असतात. अशा वेळी तुम्ही लगेच त्यांना पाणी आणून दिले, म्हणजे त्यांनाही चांगले वाटते.
आ. आईला गिरणीवरून दळण, पेठेतून (बाजारातून) भाजी इत्यादी आणून द्यावे. त्यासाठी तिच्याकडे चॉकलेट आदी खाऊ मागू नये.
इ. आई-वडिलांना त्रास न देता स्वतःची कामे स्वतः करावीत.
ई. जेवणापूर्वी सर्वांची ताटे-वाट्या, पाट-पाणी इत्यादी घ्यावे. जेवण झाल्यावर सर्व आवरून ठेवावे.
उ. रात्री सर्वांची अंथरुणे घालून ठेवावीत.
ए. आई-वडिलांचे पाय चेपावेत.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’