मुलांनो, परीक्षेला जातांना आसन क्रमांक, पुरवण्या, पर्यवेक्षकांच्या (सुपरवायझर) स्वाक्षर्या, प्रवेशपत्र (हॉल तिकीट), परीक्षेविषयी सूचना, अभ्यासाचा ताण अशा अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि या तणावामुळे साध्या साध्या गोष्टींतही तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. त्या चुका कशा टाळायच्या, याविषयी पुढील लेखात पाहूया.
१. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काय करावे ?
अ. ‘परीक्षा केंद्रावर साधारण अर्धा घंटा (तास) आधी पोहोचावे. तेथे गेल्यानंतर लगेचच स्वतःचा आसन क्रमांक आणि सभागृह क्रमांक व्यवस्थित पडताळून घ्यावा.
आ. ‘कॉपी’ म्हणून पकडली जाऊ शकते, अशी कोणतीही वस्तू स्वतःसमवेत परीक्षा सभागृहामध्ये नेऊ नये.
इ. लाल, हिरवी आणि काळी या रंगांची शाई परीक्षकाने उत्तरपत्रिका पडताळण्यासाठी वापरायची असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी निळ्या शाईच्या २ लेखण्या (पेन) सभागृहात न्याव्यात.
ई. परीक्षा आरंभ होण्यापूर्वी कुलदेवतेला किंवा उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.
उ. पर्यवेक्षक ज्या तोंडी सूचना देतील, त्या व्यवस्थित ऐकाव्यात आणि फळ्यावर लिहितील, त्या व्यवस्थित वाचाव्यात. पर्यवेक्षकाव्यतिरिक्त अन्य कोणाला काही विचारू नये.
ऊ. उत्तरपत्रिका हातात पडल्यावर प्रथम तिची पाने आणि क्रमांक पडताळून पहावेत. सदोष उत्तरपत्रिका असल्यास ती पालटून घ्यावी. नंतरच आपला आसन क्रमांक आणि इतर विवरण सूचनेप्रमाणे भरावे.
ए. परीक्षेच्या वेळी विध्यार्थ्याला वातावरणातील वाईट शक्ती त्रास (उदा. उत्तरे न सुचणे, वाचलेले न आठवणे) देऊ शकतात. हे त्रास टाळण्यासाठी विध्यार्थ्याभोवती संरक्षककवच असणे आवश्यक असते. यासाठी डोळे मिटावेत आणि मनाने कल्पना करून (सूक्ष्मातून) बाक आणि उत्तरपत्रिका यांच्याभोवती नामजपाचे मंडल (चारी बाजूंनी नामजप आहे, अशी कल्पना करणे) काढावे. यामुळे उत्तरपत्रिका लिहितांना वाईट शक्तींचे अडथळे येणार नाहीत.
ऐ. प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर आपल्या हातात पडते. तिची पाने आणि प्रश्न क्रमांक व्यवस्थित असल्याची निश्चिती (खात्री) करून मगच प्रश्नपत्रिकेच्या वरील उजव्या कोपर्यात आपला आसन क्रमांक लिहावा आणि प्रश्नपत्रिका वाचण्यास प्रारंभ करावा.
ओ. प्रश्नपत्रिकेवर काही लिहिणे किंवा तिची देवाणघेवाण करणे, याला प्रतिबंध (मनाई) आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास सोप्या प्रश्नांच्या प्रारंभी खूण म्हणून एखादे टिंब दिल्यास ते प्रश्न अगोदर सोडवू शकतो.
औ. प्रश्नपत्रिकेच्या, तसेच प्रत्येक प्रश्नाच्या आरंभीच्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात. ‘कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत’ आणि ‘कोणत्या प्रश्नाला किंवा उपप्रश्नाला पर्याय आहेत’, याकडे नीट लक्ष द्यावे.
अं. घंटा वाजली की, मगच उत्तरपत्रिका लिहायला प्रारंभ करावा. त्या वेळी ‘देवच माझ्याकडून उत्तरपत्रिका लिहून घेत आहे’, असा भाव ठेवावा. ‘आपण यशस्वी होणारच’, या प्रबळ इच्छेने उत्तरपत्रिका लिहावी.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘अभ्यास कसा करावा ?’