मुलांनो, आठवा बरं शाळेत जातांना आपण कसे जातो ? रात्री उशिरापर्यंत दूरचित्रवाणी पाहिल्यामुळे उठायला आधीच उशीर झालेला असतो. आंघोळ नाही, केस विंचरायला वेळ न मिळाल्यामुळे असाच हात फिरवतो. कसाबसा चहा पिऊन, वह्या-पुस्तके दप्तरात कोंबून घाईत बस पकडतो. याच घाईगडबडीत शाळेत पोहोचतो, तोच वर्ग चालू झालेला असतो, तेव्हा लक्षात येते की, काल गृहपाठ करायचा राहून गेला. आता काहीतरी शिक्षा होणार. मनाच्या अशा स्थितीत शिकवलेले चांगल्याप्रकारे ग्रहण होत नाही; म्हणूनच प्रयत्नपूर्वक पुढील गोष्टी करा !
शाळेत जाण्यासाठीची पूर्वसिद्धता
१. शाळेत सांगितलेला गृहपाठ पूर्ण करावा.
२. वेळापत्रकातील विषयांनुसार वह्या-पुस्तके आणि अन्य शालेय साहित्य घेऊन स्वतःच दप्तर व्यवस्थित भरावे.
३. नखे कापलेली असावीत. (ती आठवड्यातून एकदा कापावीत.)
४. शाळेचा गणवेश स्वच्छ धुतलेला आणि इस्त्री केलेला असावा.
५. विद्यार्थ्यांनी कपाळाला टिळा लावावा.
६. विद्यार्थीनींनी बांगड्या घालाव्यात, कुंकू लावावे आणि दोन, अन्यथा एक वेणी घालावी. वेणीला शक्यतो गणवेशाला पूरक रंगाची ‘रिबीन’ लावावी, उदा. निळा गणवेश असेल, तर निळ्या रंगाची रिबीन लावावी.
७. जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आठवणीने घ्यावी.
शाळेत जाणे
१. शाळेत वेळेवर पोहोचता येईल, अशा बेताने घरातून निघावे.
२. निघतांना आई किंवा घरातील अन्य मोठ्या व्यक्ती (उदा. आजी-आजोबा) यांना सांगून आणि देवाला नमस्कार करून बाहेर पडावे.
३. वाटेत मनातल्या मनात कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचा नामजप करावा.