राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती होण्यासाठी हे करा !

मुलांनो, जसे तुमच्या घरात कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही छोटी-मोठी कामे करता, त्याचप्रमाणे ज्या देशात तुम्ही रहाता, त्या देशाप्रतीही तुमची काही कर्तव्ये आहेत. ही कर्तव्ये पार पाडायची असतील, तर प्रथम तुमच्यात राष्ट्राभिमान निर्माण व्हायला हवा.

१. स्वतःमध्ये राष्ट्रप्रेम वाढवा !

विविध देशभक्तीपर गीते म्हणण्यास शिका !

भजने, आरत्या, पाळणा, देशभक्तीपर गीते, क्षात्रगीते, पोवाडे इत्यादी शिकत किंवा म्हणत असतांना त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

अ. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फाशी जाणार्‍या क्रांतीकारकांच्या तोंडी ‘वन्दे मातरम्’ हेच शब्द असायचे. त्यामुळे ‘वन्दे मातरम्’ हे गीत म्हणतांना क्रांतीकारकांच्या बलीदानाची आठवण होते. हे गीत संस्कृतप्रचुर असल्याने त्यातील चैतन्याचा म्हणणार्‍याला आणि ऐकणार्‍याला लाभ होतो. मुलांनी या गीताची सर्व कडवी तोंडपाठ करून ते गीत चालीत म्हणण्यास शिकावे.

आ. ‘शिवकल्याण राजा’, ‘माझे राष्ट्र महान’ यांसारख्या ध्वनी-चकत्या (सीडी) / ध्वनीफीती (कॅसेट) यांतील राष्ट्रभक्तीपर गीते ऐकावीत आणि पाठ करून म्हणावीत. शाळेत किंवा इतर ठिकाणी समूहगीतांच्या स्पर्धा असतील, तेव्हा ‘वन्दे मातरम्’ हे गीत, तसेच अन्य देशभक्तीपर गीतेच ‘समूहगीते’ म्हणून सादर करावीत. एकत्रित येऊन देशभक्तीपर गीते म्हटल्याने मुलांमध्ये संघटितपणा निर्माण होतो.

इ. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य शूरांच्या स्फूर्तीदायी चरित्रांची माहिती होण्यासाठी आणि त्यांच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण होण्यासाठी पोवाडे म्हणण्यास शिकावेत. पोवाड्यांमुळे क्षात्रवृत्ती निर्माण होऊन राष्ट्रभक्तीचा संस्कारही होतो.

अशी काही गीते balsanskar.com च्या पुढील मार्गिकेवर (लिंकवर) ऐकण्यास मिळतील

https://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/cid_65.html

२. राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती होण्यासाठी हे करा !

अ. देवभक्ती अन् राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते म्हणा, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा ! : मुलांनो, संतांचे अभंग, भजने, भक्तीगीते, तसेच देशभक्तीपर गीते, क्षात्रगीते, समरगीते आणि पोवाडे ऐका, ते सर्व एका स्वतंत्र वहीत लिहून घ्या, तोेंडपाठ करा अन् संधी मिळाल्यास सार्वजनिक कार्यक्रमात (ठिकठिकाणच्या गाण्यांच्या स्पर्धा, शाळेचे स्नेहसंमेलन किंवा अन्य कार्यक्रम) सादर करा !

सार्वजनिक ठिकाणीही देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर केल्याने तुमचा राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान वाढेल आणि वृत्ती सात्त्विक होईलच; पण समाजासमोरही नीतीमत्ताहीन नट-नट्यांचा आदर्श रहाण्यापेक्षा संत, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचा आदर्श राहील. देवतेप्रती भाव असणार्‍या विध्यार्थ्याने भक्तीगीत म्हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील भाव जागृत करते. त्याचप्रमाणे देशाविषयी प्रेम असलेल्या विध्यार्थ्याने देशभक्तीपर गीत म्हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील देशप्रेम जागृत करते.

आ. शाळेच्या स्नेहसंमेलनात संत, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक आदी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील नाटिका सादर करा !

इ. कथाकथन, वक्तृत्व, निबंधलेखन इत्यादी स्पर्धांत भाग घेऊन त्यांतून राष्ट्र अन् धर्म यांची सध्याची दुःस्थिती आणि ती सुधारण्यासाठी करावयाची उपाययोजना मांडा !

ई. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वाढवणारे कार्यक्रम आयोजित करण्याविषयी वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांना विनंती करा ! : जादूगार, नकलाकार, विनोदवीर, लांब नखे वाढवलेला माणूस आदींचे कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा पुढील कार्यक्रम मुलांसाठी लाभदायक आहेत.

  • संतांच्या जीवनावरील आणि देशभक्तीपर चित्रपट
  • स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलातील निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ इतिहासतज्ञ इत्यादींचे अनुभवकथन आणि मार्गदर्शन
  • क्रांतीकारकांची चरित्रे सांगणारी व्याख्याने
  • राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्तींचा सत्कार

उ. शाळेतील एखाद्या जाहीर कार्यक्रमात हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचे महत्त्व सनातनच्या ‘संस्कार वही’च्या आधारे सांगा ! तसेच त्या वहीतील छापील लिखाणाची कात्रणे कापून मुख्याध्यापकांच्या अनुमतीने शाळेच्या सूचनाफलकावर लावा !

ऊ. ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धेच्या वेळी हिंदु संस्कृतीनुसार आदर्श वेशभूषा (उदा. मुलांनी धोतर-अंगरखा (सदरा) घालणे, मुलींनी साडी नेसणे), तसेच सैनिकी गणवेश परिधान करणे इत्यादी वेशभूषा सादर करा !

ए. सुटीच्या काळात संत, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांची जन्मस्थळे / समाध्या / स्मारके, तसेच ऐतिहासिक गड, जलदुर्ग आणि संग्रहालये यांना भेट देऊन तेथील महती किंवा इतिहास जाणून घ्या !

ऐ. ‘ऑर्केस्ट्रा’सारखे कार्यक्रम ठेवणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे यांचे प्रबोधन करा अन् त्यांना देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर करण्याची विनंती करा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !