मुलांनो, दिवसाचा आरंभ (सुरुवात) चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. शरिराप्रमाणे मन शुद्ध व्हावे, यासाठी प्रतिदिन पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. मन शुद्ध राहिल्यास आपला अभ्यासही चांगला होईल. मग आहे कि नाही, सोप्पा उपाय !
१. टिळा किंवा कुंकू लावावे
१. स्नानानंतर मुलांनी केसांना खोबरेल तेल लावावे आणि केस विंचरून डाव्या अंगाला (बाजूला) भांग पाडावा.
२. मुलांनी भ्रूमध्यावर (दोन भुवयांच्या मध्ये) मधल्या बोटाने टिळा (उभे कुंकू) लावावा, तर मुलींनी भ्रूमध्यावर अनामिकेने (अंगठ्या शेजारचे बोट) गोल कुंकू लावावे. मुलींनी शक्यतो टिकली लावू नये.
मुला-मुलींनो, कुंकू लावलेल्या व्यक्तीला देवतेची शक्ती आणि चैतन्य मिळते, तसेच आसुरी शक्तींपासून रक्षण होते.
२. देवाची पूजा करावी
देवघरात पूजा झालेली असल्यास स्नानानंतर प्रथम देवघरासमोर उभे राहून देवाला हळद-कुंकू आणि फूल वहावे. देवाला उदबत्तीने ओवाळावे. एखाद्या वेळी पूजा झालेली नसल्यास वडीलधार्यांची अनुमती घेऊन आपण ती करावी.
३. श्री गणेशवंदन करावे आणि अन्य श्लोक म्हणावेत
देवाची पूजा करून झाल्यावर श्री गणेशाला वंदन करावे. या वेळी दोन्ही हात जोडून पुढील श्लोक म्हणावा.
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
यानंतर पाठ असलेले अन्य श्लोक म्हणावेत.अर्थ : (दुर्जनांचा नाश करणारी) वाकडी सोंड, महाकाय (शक्तीमान) आणि कोटी सूर्यांचे तेज असलेल्या श्री गणेशा, माझी सर्व कामे सदा कोणतेही विघ्न न येता सफल होऊ देत.
४. पुढीलप्रमाणे देवाला प्रार्थना कराव्यात !
१. हे देवा, मला चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिवसभर साहाय्य कर आणि वाईट गोष्टींपासून सदा दूर ठेव.
२. हे कुलदेवते, तुझ्या नामजपाचे मला सतत स्मरण राहू दे.
३. हे श्रीरामा, मला सर्व थोरामोठ्यांचा आदर करायला शिकव.
४. हे श्रीकृष्णा, मला माझा देश आणि धर्म यांविषयी प्रेम वाटू दे.
५. देवाला नमस्कार करावा
कुलदेवता किंवा उपास्यदेवता, तसेच अन्य देवता यांना मनोभावे साष्टांग नमस्कार घालावा. साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तर हात जोडून नमस्कार करावा.
६. देवाचा नामजप करावा
शेवटी बसून १० मिनिटे तरी देवाचा नामजप करावा. कोणत्या देवाचा नामजप करावा, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.
१. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांची कुलदेवता श्री भवानीमातेची उपासना करायचे. श्री भवानीमातेच्या आशीर्वादाने ते ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापू शकले. मुलांनो, इतर देवतांपेक्षा आपली कुलदेवता आपल्या हाकेला लगेच ‘ओ’ देणारी असते; म्हणून तिची उपासना करावी. यासाठी तिचा नामजप करावा.
२. नामजप करतांना देवतेच्या नामाआधी ‘श्री’ लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदेवता भवानीदेवी असेल, तर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ असा नामजप करावा. उपास्यदेवता गणेश असेल, तर ‘श्री गणेशाय नमः ।’ असा नामजप करावा. कुलदेवता ठाऊक नसेल, तर उपास्यदेवतेचा नामजप करावा.
३. दिवसभरही मध्ये मध्ये नामजप करायचा प्रयत्न करावा.
केवळ शालेय परीक्षेच्या दिवशी उत्तीर्ण व्हावे; म्हणून वरील गोष्टी न करता त्या प्रतिदिन केल्या, तर देवाची कृपा होऊन आपण जीवनातील प्रत्येक परीक्षेत नक्की यशस्वी होऊ !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’