आयुर्वेद म्हणजे प्राचीन ऋषीमुनींची अनमोल देणगी !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. यासाठी आयुर्वेद हे एक प्राचीन काळापासून उपयोगात आणलेले परिणामकारक माध्यम आहे.

‘आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत. आयुर्वेदाने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट चवीच्या अन्नाचा अन् द्रव्यांचा दोष, धातू आणि मळ यांवर कसा परिणाम होतो, याचे चांगले वर्णन केले आहे.

‘‘न अनौषधं जगति किंचित् द्रव्यं उपलभ्यते’’

चरक सू २६-१२

जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही, असे आयुर्वेदाने म्हटले आहे.’ (‘आयुर्वेदीय औषधी’, वैद्याचार्य डॉ. वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले )

आयुर्वेदात धन्वंतरीदेवता आणि प्रार्थना यांचे स्थान

रोगाचा नाश करून आरोग्य प्रदान करणार्‍या धन्वंतरीदेवतेला आयुर्वेदात विशेष स्थान आहे. औषधी वनस्पती काढतांना, तिच्यावर प्रक्रिया करतांना आणि ती सेवन करतांना अशा प्रत्येक टप्प्यांवर प्रार्थनेला महत्त्व दिले गेले आहे.

आयुर्वेदाचे महत्त्व जाणून घ्या

आजकाल प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, अनेक जण लगेच ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधे घेणे चालू करतात. प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेल्या ‘आयुर्वेदा’चे महत्त्व विसरले जाते. ‘अ‍ॅलोपॅथिक’ औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा त्या औषधोपचारातून दुसरा एखादा विकार निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदिक औषधांमुळे असे होत नाही. आयुर्वेदिक औषधांमुळे निरोगी आणि दीर्घायुषी होता येते. आयुर्वेदाचे महत्त्व जाणून आता पाश्चात्त्य देश आयुर्वेदिक औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहात आहे.

आयुर्वेदीय औषधांचे आधुनिकीकरण

आयुर्वेदीय औषधांचे कार्य उशिरा चालू होते; म्हणून ‘तीव्र रोगांवर त्याचा विशेष उपयोग होत नाही’, असा समज आहे. त्यासाठी या औषधांतील कार्यशील तत्त्वे (अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स) वेगळी करून त्यांच्या गोळ्या आणि इंजेक्शन्स बनवावीत.’

संदर्भ : ‘आयुर्वेदीय औषधी’, वैद्याचार्य डॉ. वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले

मुलांनो, आयुर्वेद ही ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. हिंदु संस्कृतीचा हा वारसा जपण्याचे दायित्व तुमच्यावरच आहे, हे लक्षात ठेवा!

Leave a Comment