नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. २४ फेब्रुवारी १८२४ या दिवशी इंग्रजांचा ‘भांबुडा’ येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या साहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.
याच काळात इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्याचा आदेश दिला. उमाजी नाईक यांना पकडून देणार्यास १० सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. लोकांना एकत्र करून आणि गनिमी काव्याने युद्ध करत इंग्रजांसमोर मोठे आव्हान उमाजींनी निर्माण केले. १५ डिसेंबर १८३१ हा उमाजींच्या जीवनातील काळा दिवस ठरला. भोरमधील एका खेडेगावात त्यांना पकडून इंग्रज सरकारने उमाजींच्या विरोधात न्यायालयात खटला भरला. राजद्रोह, देशात बंडाळी माजवणे, असे दोषारोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ३ फेब्रुवारी १८३२ या दिवशी पुणे येथील खडकमाळ कचेरीत उमाजी नाईक यांना फासावर चढवण्यात आले. केवळ ४१ व्या वर्षी उमाजी नाईक हे देशासाठी हुतात्मा झाले.