गोंदवलेकर महाराज


जन्म व बालपण

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म शके १७६६ माघ शुध्द द्वादशी (१९ फेब्रुवारी १८४५) बुधवारी, सकाळी ९:३० च्या सुमारास तालुका माण, जिल्हा सातारा येथील गोंदवले बुद्रुक येथे झाला. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व सात्त्विक वृत्तीचे होते. जन्मावेळी त्यांचे नाव गणपती ठेवण्यात आले होते. श्री ब्रह्मचैतन्य श्रीरामाचे उपासक होते. ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत.

गुरुकृपा

वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरूच्या शोधार्थ घर सोडले. त्यावेळी त्यांच्या वडीलांनी कोल्हापूर येथून त्यांना परत आणले. काही काळाने त्यांनी पुन्हा गृहत्याग करून गुरुशोधार्थ पदभ्रमण सुरू केले. अनेक संतसत्पुरुषाच्या भेटी घेतल्या. अखेर मराठवाड्यातील नांदेडपासून जवळ येहेळगावी "श्रीतुकामाई" यांच्याकडून त्यांना शिष्यत्व प्राप्त झाले. अतिशय कठोर अशा कसोट्या देत, गुरुआज्ञापालन करीत, त्यांनी गुरुसेवा केली. यावेळी त्यांचे वय १४ वर्षांचे होते. श्रीतुकामाईंनी त्यांना "ब्रह्मचैतन्य" हे नाव दिले, रामोपासना दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. यानंतर श्री तुकामाईंच्या आदेशानुसार महाराजांनी बराच काळ तीर्थाटन केले.

नंतरचे आयुष्य

गृहत्यागानंतर नऊ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले येथे परतले. इथून पुढचे सारे आयुष्य त्यांनी राम नामाचा प्रसार व विविध ठिकाणी राममंदिरांची स्थापना यासाठी वेचले. गुरुआज्ञेनुसार स्वतः गृहस्थाश्रमात राहून जनसामान्यांना प्रपंच करत परमार्थ कसा साधावा याचे मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण ठेवावे आणि त्याच्या ईच्छेने प्रपंचातील सुखदुःखे भोगावीत हे त्यांच्या उपदेशाचे सार आहे. गोरक्षण व गोदान, अखंड अन्नदान, अनेक वेळा विविध कारणांनी केलेल्या तीर्थयात्रा हे महाराजांच्या चरित्राचे काही ठळक विशेष आहेत. सुष्ट आणि दुष्ट, ज्ञानी आणि अज्ञ, यांच्याबद्दल समभाव, निस्पृहता, कल्याणकारी वृत्ती, दीन अनाथांचा कळवळा, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, जनप्रियत्व, रसाळ वाणी हे महाराजांचे सहजगुण आहेत. समोरची व्यक्ती कोणीही असो, ते प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आणि खुबीने मार्गदर्शन करीत. सामान्यांशी ते घरगुती आणि सोप्या भाषेत संवाद साधत, तसेच वेदसंपन्न ज्ञानी मंडळींशी चर्चा करण्याचा प्रसंग आला असता त्यांनाही वैदिक कर्मांच्या जोडीने नामस्मरण करण्याची आवश्यकता पटवून देत.

त्यांची श्रीरामाशी असलेली अनन्यता आणि दृढ श्रद्धा त्यांच्या वागण्याबोलण्यातून सतत व्यक्त होत असे. नामस्मरण या साधनाची आजच्या युगातली थोरवी त्यांनी कळकळीनें व विविध मार्गांनी मार्मिक दाखले देऊन सांगितली. || श्री राम जय राम जय जय राम || या त्रयोदशाक्षरी मंत्राचे महात्म्य विषद करण्यासाठी त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन, चर्चा, शंकासमाधान या सर्व मार्गांचा अवलंब केला. श्रीरामाच्या इच्छेखेरीज काहीही घडत नाही, आणि अखंड रामनाम जपल्यास आनंद आणि समाधान लाभते, या महाराजांच्या सांगण्याचा अनुभव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक साधकाने घेतला आहे.

Leave a Comment