सूर्यमंदिर – कोणार्क
ओडिशा राज्यातील कोणार्कच्या सूर्यमंदिराची रचना एका भव्य रथाप्रमाणे होती. गंग वंशातील राजा नरसिंहदेव याच्या कार्यकाळात (वर्ष १२३८ ते १२६४) या मंदिराची उभारणी झाली. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण अंगांना (बाजूंना) बारा-बारा मोठी चाके होती आणि पूर्वेला सात अश्व (घोडे) जोडले होते. या मंदिराच्या रचनेसाठी १,२०० शिल्पकार सतत १६ वर्षे कार्यरत होते. एका अखंड शिळेमध्ये निर्मिलेल्या या मंदिराच्या कळसाचे वजन १,०२० कि.ग्रॅ. इतके होते ! या मंदिराच्या अन्य शिळांवर नवग्रह, हत्ती, अश्व, राजसभा, चतुरंग सैन्याचे युद्ध, योगसाधना करत असलेले योगी, देवपूजा करत असलेले भक्त, गुरु-शिष्य जोड्या अशी असंख्य चित्रे कोरली होती. ‘काला पहाड’ या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या मुसलमान सरदाराने हे मंदिर उद्ध्वस्त केले. या मंदिरातील सूर्यमूर्तीही नष्ट झाली आहे. आता या प्राचीन सूर्यमंदिराचे केवळ भग्नावशेषच पहायला मिळतात.
आपली प्राचीन मंदिरे ही वास्तूकला, शिल्पकला, मूर्तीकला आदी विषयांतील हिंदूंच्या प्रगतीचे साक्षीदार आहेत. त्यांची पुनर्उभारणी करणे, हे आपले राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे !