‘होळी’ या सणाच्या माध्यमातून इतरांना आनंद होईल, असे वागणे आवश्यक !
‘विद्यार्थी मित्रांनो, हिंदु संस्कृतीनुसार आपण आपल्या देशात अनेक सण साजरे करतो. सणाच्या दिवशी आपण आनंदी होऊन आपल्याला इतरांना आनंद देता यायला हवा. मग मित्रांनो, मला सांगा, आपण ‘होळी’ या सणाच्या माध्यमातून खरेच इतरांना आनंद होईल, असे वागतो का ? नाही ना ? लोकांना आपले सण नकोसे वाटतात. आपले सण इतके वाईट आहेत का ? नक्कीच नाहीत.
धर्मशिक्षण घेऊन सणांमधील सर्व अपप्रकार दूर करा !
धर्मशिक्षण न मिळाल्याने प्रत्येक सण का आणि कसा साजरा करावा, त्यामागील शास्त्र काय आहे, हे आपल्याला ठाऊक नाही; म्हणून आपल्या सणांमध्ये अनेक अपप्रकार आलेले आहेत. हे अपप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलाने धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊया आणि सणांमधील सर्व अपप्रकार दूर करूया. आपल्यासाठी हीच खरी होळी असेल.
होळीच्या दिवशी पुढील कृती टाळून धर्मकर्तव्य बजावा !
अ. बलपूर्वक (जबरदस्तीने) वर्गणी गोळा करू नका !
आ. घाणेरड्या पाण्याचे फुगे मारू नका !
इ. पाण्याचा अनावश्यक वापर करू नका !
ई. बलपूर्वक (जबरदस्तीने) रंग लावू नका !
उ. तेलाचे रंग वापरणे टाळा !
ऊ. मोठ्या स्वरात ‘डी.जे.’ लावून ध्वनीप्रदूषण टाळा !
ए. इतरांना दुःख होईल, अशा कृती करू नका !
ऐ. टायर जाळून प्रदूषण करू नका !
होळीच्या दिवशी पुढील कृती करून धर्महानी रोखा !
अ. आपल्या मित्रांना होळीच्या शुभेच्छा मराठीतूनच द्या.
आ. नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करा.
इ. इतरांना आनंद होईल, अशाच कृती करा.
ई. होळीतील अपप्रकार रोखण्यासाठी मुलांचे प्रबोधन करा.
उ. ‘होळीसमवेत माझ्यातील दोष नष्ट होऊन सद्गुण वाढू देत’, अशी प्रार्थना करा.
आपण होळीच्या दिवशी वरील सर्व गोष्टी आचरणात आणून देवाची कृपा संपादन करूया. चला तर मित्रांनो, ‘वरील प्रत्येक कृती आमच्या आचरणात येऊ दे’, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करूया.’
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.