भवसागर तरून नेणारा नावाडी – श्रीराम


‘कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभु रामचंद्र आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासाला निघाले. वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले. तो धावत धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालून म्हणाला, "प्रभु, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो ! मी आपली कोणती सेवा करू ?”

रामप्रभु म्हणाले, "गुहका, तुझ्याकडून दुसर्‍या कुठल्याच प्रकारच्या सेवेची आम्ही अपेक्षा करत नाही. केवळ तुझ्या नावेतून तू आम्हाला गंगेच्या पैलतिराला पोहोचव.” त्याप्रमाणे गुहकाने त्या तिघांना पैलतिराला नेऊन सोडले. पैलतिरी पोहोचविल्यावर त्यांच्यात पुढील संवाद झाला.

राम : गुहका, नावेतून आम्हाला पैलतिराला पोहोचविल्याबद्दल मी तुला काय देऊ ?

गुहक : प्रभु, एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याचे केस कापतो, तेव्हा तो त्याच्याकडून मोबदला घेतो का ?

राम : नाही.

गुहक : प्रभु, एक वैद्य दुसर्‍या वैद्याला औषध देतो, तेव्हा तो त्याच्याकडून औषधाचा मोबदला घेतो का ?

राम : नाही.

गुहक : मग त्याचप्रमाणे मी आणि आपण असे दोघेही नावाडी असतांना मी आपल्याकडून मोबदला कसा काय घेऊ ?

(गुहकाच्या या विधानाने राम आश्चर्यचकित झाला.)

राम : गुहका, तू नावाडी आहेस, हे उघडच आहे; पण तू मलाही नावाडी कसे काय करून टाकलेस ?

गुहक : प्रभु, मी लोकांना या नदीच्या पैलतिराला पोहचवितो; पण आपण तर इच्छुक प्रवाशांना भवसागराच्या, म्हणजे संसाररूपी सागराच्या पैलतिराला नेऊन पोहोचते करता. तेव्हा आपण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ नावाडी नाही का ?

गुहकाचा हा युक्तीवाद ऐकून आणि त्याचे निरपेक्ष प्रेम पाहून रामप्रभूंनी त्याला दृढ आलिंगन दिले. रामप्रभूंकडून अलिंगन सुख म्हणजे प्रत्यक्ष जिवा-शिवाची भेट. गुहकाला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले.गुहकाला राम हा अवतार आहे, हे लक्षात आले. यावरून त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असला पाहिजे, हे लक्षात येते.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)

Leave a Comment