रामसेतू


‘आज जगातला प्रत्येक देश त्याचा स्वतःचा प्राचीन वारसा अत्यंत परिश्रमाने हवी ती मूल्ये देऊन जपत आहे. आज या दयनीय, दीन, उपेक्षित आणि निराश्रय भारतवर्षात मात्र उलट घडते आहे. `नासा’ या अमेरिकन संस्थेने उपग्रहावरून सागरातल्या सेतूचा शोध घेतला आणि ‘तो सेतू १७ लक्ष ५० सहस्र वर्षांपूर्वीचा आणि मानवाने निर्मिलेला आहे’, असा निष्कर्ष सांगितला. हा सेतू ४८ किलोमीटर लांब आहे.`नासा’ या संस्थेने जी रामसेतूची चित्रे दिली, त्यांचे जे विस्ताराने वर्णन केले व त्याचे आयुष्य १७ लक्ष ५० सहस्र वर्षे सांगितले, ते अक्षरशः वाल्मीकींच्या रामायणातल्याप्रमाणे आहे.

नल या श्रेष्ठ अभियंत्याचे ज्ञान व कौशल्य असणार्‍या विश्वकर्माच्या पुत्राने तो सेतू वानरविरांच्या मदतीने बांधला. पांडवांची मयसभा, लंका आणि अनेक प्राचीन श्रेष्ठ सर्वांगपरिपूर्ण नगरे निर्माण करणार्‍या विश्वकर्म्याचा तो पुत्र आहे. पित्याचे कौशल्य त्याच्यात उतरले आहे. श्रीवाल्मीकिरामायणाच्या युद्धकांडातील २२ व्या अध्यायात सेतूचे विस्ताराने वर्णन आहे. श्रीरामाने ३ दिवस अहोरात्र सागर किनार्‍यावर व्रतस्थ राहून ‘लंकेला जाण्याकरता वाट द्यावी’, म्हणून सागराची प्रार्थना केली; परंतु सागराने उपेक्षा केल्यावर संतप्त श्रीरामाने सागर शुष्क करून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा सागराने सेतू बांधायला सांगितला आणि ‘नल हा कुशल असून त्याच्या मार्गदर्शनाखाली सेतू बांधता येईल’, असे तो म्हणाला.

नंतर श्रीरामाच्या आज्ञेने सहस्रशः वानरविरांनी गहन अरण्यात प्रवेश करून साल, अश्वकरण, धाब, वंश, कुटन, अर्जुन, ताल, निलक, बिस्त, शतपर्ण, आम्र, अशीक, असे असंख्य वृक्ष आणून सागर किनार्‍यावर ठेवले. हत्तीसारखे प्रचंड खडक आणि पाषाण पर्वत-टेकड्यांवरून आणले अन् ते सागरात फेकले. तेव्हा सागराचे पाणी आकाशापर्यंत वर उडाले. सेतूचे काम सुकर व्हावे, म्हणून काही वानरांनी सहस्र योजनांचा प्रचंड दोरखंड सागरावर ओढून धरला.

मध्यसागरातून नलाने सेतू बांधायला प्रारंभ केला. अथक परिश्रम करणार्‍या सहस्रशः वानरविरांच्या साहाय्याने वानरांनी तो सेतू ५ दिवसांत पूर्ण केला.


स नलेन कृतः सेतुः सागरे मकरालये ।
शुशुभे सुभगः श्रीमान् स्वातीपथ इवाम्बरे ।।

– श्रीवाल्मीकिरामायण ६.२२.७४

अर्थ : मकरालय समुद्रात नलाने निर्मिलेला तो सुंदर आणि शोभीवंत सेतू आकाशातल्या स्वातीपथाप्रमाणे सुंदर दिसत होता.तो आकाशगंगेसारखा सुंदर सेतू जणू ती सागराचे विभाजन करणारी रेखा होती.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००७)

Leave a Comment