रामनवमी

रामनवमी निमित्त श्रीरामासारखे गुण आत्मसात
करून आदर्श आणि आनंदी जीवन जगण्याचा निश्चय करूया !

‘विद्यार्थीमित्रांनो, आपले जीवन आनंदी आणि आदर्श व्हायला हवे’, असे आपणाला वाटते ना ? यासाठी आपणाला आपल्यातील रावणरूपी दुर्गुणांचा नाश करावा लागेल, तरच आपले जीवन श्रीरामासारखे आदर्श आणि आनंदी होईल. जोपर्यंत आपण आपल्यात सद्गुण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा अपसमज झाला आहे की, परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि गुणवत्ता सूचीत आपले नाव आले की, झाले. यातून आपण खर्‍या अर्थाने आनंदी होतो का, ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे. श्रीरामासारखे आदर्श आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सद्गुणांच्या विकासाविना दुसरा मार्ग नाही. मित्रांनो, सद्गुण हाच जीवनाचा पाया आहे. पाया नसेल, तर एखादी इमारत उभी राहील का ? तसेच आज आपल्या जीवनाचे झाले आहे. आज आपल्या सर्वांच्या जीवनात तणाव आणि दुःख दिसत आहे. अभ्यास करतांनाही उत्तम गुण मिळवण्याच्या ताणामुळे विद्यार्थी ज्ञानाच्या आनंदापासून वंचित रहातात. काही विद्यार्थी लहान वयातच व्यसनाधीन होत आहेत, तर काही जण उत्तम गुण न मिळाल्यास निराश होऊन आत्महत्या करत आहेत. मित्रांनो, हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ? चांगले गुण मिळवून आपल्याला चांगल्या वेतनाची चाकरी मिळेल; पण आनंदी जीवन जगू, याची शाश्वती नाही. यासाठी १४ वर्षे वनवासात असतांनाही आनंदी जीवन जगणार्‍या श्रीरामाचे गुण आपल्यात आणण्याचा निश्चय करूया.

जीवनाची सूत्रे

सद्गुण : आनंदी आणि आदर्श जीवन

दुर्गुण : दुःखी तणावग्रस्त जीवन

व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनात दुर्गुणांचे प्राबल्य वाढते, तेव्हा व्यक्ती, समाज अन् राष्ट्र दुःखी आणि तणावग्रस्त जीवन जगतात. आज आपल्या सर्वांच्या जीवनात हेच झाले आहे. यासाठी आपण श्रीरामाचे आदर्श जीवन आणि आपले जीवन यांतील भेद समजून घेऊया.

रामायण विषयी प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे क्लिक करा !

आदर्श पुत्र

श्रीराम आई-वडिलांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे. आई-वडिलांनी केलेली आज्ञा लगेच आचरणात आणत असे; म्हणून त्याला आपण आजही ‘आदर्श पुत्र’ असे म्हणतो.

सध्या आपण पाहतो की, मुले आई-वडिलांशी उद्धटपणे बोलतात. त्यांना उलट उत्तरे देतात आणि ‘स्वतःला फार कळते’, अशा अहंकारात वावरतात. सध्या मुले आई-वडिलांना साधा नमस्कारही करत नाहीत. मित्रांनो, याला आपण आदर्श जीवन म्हणायचे का ? त्यामुळेच आज आपण दुःखी जीवन जगत आहोत. आज रामजन्माच्या दिनी आपण श्रीरामासारखा आदर्श पुत्र होण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, असे प्रयत्न करणार ना ?

संस्कृती म्हणजे आई-वडील आणि मोठ्यांचा आदर करणे अन् विकृती म्हणजे आई-वडील आणि मोठ्यांचा अनादर करणे हे लक्षात ठेवा.

आदर्श बंधू

विद्यार्थीमित्रांनो, आदर्श भाऊ कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे राम-लक्ष्मण ! श्रीराम आपला भाऊ लक्ष्मण याच्याशी प्रेमाने वागत असे. प्रत्येक प्रसंगात तो त्याला साहाय्य आणि योग्य मार्गदर्शन करत असे. ते एकमेकांविना राहू शकत नसत.

सध्याचे भाऊ एकमेकांना समजून घेत नाहीत. तसेच सतत भांडण करतात. एकमेकांशी उद्धटपणे वागतात. स्वतःची वस्तू भावाला देत नाहीत. मित्रांनो, याला आपण आदर्श भाऊ म्हणायचे का ? आज आपण अनेक पदव्या घेतो. मग आपल्यात चांगला पालट का जाणवत नाही, याचे कारण म्हणजे शिक्षणात मुलांच्या वर्तनात चांगल्या सुधारणा होण्याची व्यवस्था नाही. मित्रांनो, आजपासून आपण भक्ती वाढवून आणि दुर्गुण घालवून आपल्यात समजूतदारपणा वाढवण्याचा निश्चय करूया. हीच खरी रामनवमी होईल.

आदर्श मित्र

विद्यार्थीमित्रांनो, श्रीराम एक आदर्श मित्र होता. त्याने सुग्रीव आणि बिभीषण यांना संकटकाळी साहाय्य केले. साहाय्य केल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही.

सध्याचे मित्र असे आहेत का ? नाही ना ? मला काहीतरी द्याल, तरच साहाय्य करीन, अशी मुलांची वृत्ती दिसून येते. म्हणजे मैत्रीही अपेक्षेपोटी आणि स्वार्थापोटी असते. मित्रांनो, जिथे स्वार्थ आला, तिथे खरी मैत्री होऊच शकत नाही. आज आपल्याला समाजात सगळीकडे स्वार्थच दिसतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे; म्हणून रामनवमीच्या निमित्ताने आपण निरपेक्ष भावाने मैत्री करण्याचा आणि आनंदी जीवन जगण्याचा निश्चय करूया. मित्रांनो, करणार ना ?

निरपेक्षता असते, तिथे आनंद आणि अपेक्षा असते, तिथे दुःख असते, हे लक्षात ठेवा.

सत्य बोलणारा एकवचनी

श्रीराम सत्यवचनी होता. त्याने एकदा वचन दिले की, ते पूर्ण करत असे. सत्य म्हणजे ईश्वर ! देव कधीच खोटे बोलत नाही.

सध्या आपण पाहतो की, मुले सहजपणे खोटे बोलतात. आपण खोटे बोलून इतरांना कसे फसवले, याचे त्यांना भूषण वाटते. मित्रांनो, असे खोटे बोलल्याने आपणाला आनंद मिळेल का ? काही मुले कधी आईशी खोटे बोलतात, तर कधी शिक्षकांशी खोटे बोलतात. मित्रांनो, देव आपल्या हृदयातच आहे. आपण जेवढे खोटे बोलू, त्याची नोंद देव करतो. मुलांनो, तुम्हाला देवाचे आवडते आणि आनंदी व्हायचे आहे ना ? तर मग आपण खोटे कधीच बोलायचे नाही.

खोटे बोलणारा सतत तणावात आणि दुःखी असतो, तर खरे बोलणारा सतत आनंदी आणि इतरांना आवडणारा असतो, हे लक्षात ठेवा.

आज रामनवमीला श्रीरामाजवळ प्रार्थना करूया, ‘हे श्रीरामा, मला तुझ्यासारखे सत्य बोलण्याची शक्ती दे.’

आदर्श राजा

आपण पाहतो की, सध्याचे राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी, खोटे बोलणारे, गुंड आणि घाणेरडे वर्तन करणारे असतात. मित्रांनो, असे जर राज्यकर्ते असतील, तर जनता आनंदी राहील का ? जनतेची आईप्रमाणे काळजी घेण्यापेक्षा जनतेची संपत्ती लुटणारे हे लुटारू झाले आहेत.

श्रीराम हा आदर्श राजा होता. तो जनतेची आईप्रमाणे काळजी घेत होता. आई जशी सतत मुलांच्या विकासाचा आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे; म्हणून प्रयत्न करते, तसेच श्रीराम सतत जनतेचा विचार करत असे; म्हणून रामराज्यात लोक आनंदी होते. मित्रांनो, आपणाला असा राजा हवा ना ?, तर यासाठी आपणही आदर्श व्हायला हवे. आजही लोकांना वाटते की, रामराज्य हवे. मित्रांनो, रामराज्यातील नागरिकही आदर्श होते. आपण भावी आदर्श राजाचे नागरिक म्हणून या रामनवमीच्या निमित्ताने रामाचे सर्व गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करूया आणि ‘लवकरात लवकर आदर्श राज्य येवो’, अशी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया.

रामाने रावणाचा वध केला आणि नंतर रामराज्य आले, तसेच आपल्याला आपल्यातील रावणरूपी दोष आणि अहं यांचा नाश करावा लागेल, तरच पुन्हा रामराज्य येईल. मित्रांनो, आपण श्रीरामाकडे प्रार्थना करूया, ‘हे श्रीरामा, आम्हाला आमच्यामधील हे रावणरूपी दोष आणि अहं यांचा नाश करण्याची शक्ती आणि बुद्धी दे.’

आदर्श राजा : हा प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा आणि त्यांना आनंदी ठेवणारा असतो.

सध्याचे राजे (राज्यकर्ते) : हे जनतेला लुबाडणारे आणि दुःखी करणारे असतात.

धर्मपालन करणारा

श्रीराम स्वतः धर्माचे पालन करत असे. तो स्वतः प्रत्येक कृती धर्माप्रमाणे करत असे आणि प्रजेला करायला सांगे. धर्म म्हणजे ईश्वर ! प्रत्येक कृती ईश्वराला आवडेल, अशी करणे, म्हणजे धर्मपालन करणे. धर्मपालन करणार्‍याला ‘देवच सर्व माझ्याकडून करवून घेत आहे, याची सतत जाणीव असते.

सध्याचे राज्यकर्ते धर्माला मानतच नाहीत. ते म्हणतात, ‘आम्हीच सर्वस्व आहोत. देव इत्यादी कोणी नाही. आम्हीच कर्ते-करविते आहोत.’ देवाला न माणनार्‍या राजाच्या राज्यात जनता आनंदी राहूच शकत नाही; म्हणून आज आपणाला सगळीकडे दुःखी आणि तणावात जीवन जगणारी जनता दिसत आहे. मित्रांनो, आपण रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामाला प्रार्थना करूया, ‘हे श्रीरामा, तुझ्यासारखे धर्मपालन करणारे राज्यकर्ते आम्हाला लाभू दे आणि लवकरात लवकर रामराज्य येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

‘हे श्रीरामा, आम्हाला आदर्श राज्यातील आदर्श नागरिक होण्याची शक्ती आणि बुद्धी दे. आम्हाला तुझ्यासारखे धर्मपालन करणारे आणि जनतेची आईप्रमाणे काळजी घेणारे राज्यकर्ते लाभून लवकरात लवकर रामराज्य येऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

– श्री. राजेंद्र पावसकर(गुरुजी),पनवेल.

श्रीरामाचा नामजप, श्रीरामाची आरती आणि श्रीरामरक्षास्तोत्र ऐकण्यासाठी डाउनलोड करा ‘सनातन चैतन्यवाणी’ आप !

Leave a Comment