२६ ऑगस्ट १७८७ या दिवशी जावेतखानाचा मुलगा आणि नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर दिल्लीत आला. बादशहाने त्याची बक्षी-उल् ममालिक या जागेवर नेमणूक केली. त्याला मानाच्या पदव्या दिल्या. अतिरिक्त मद्यपानामुळे गुलाम कादरचे डोळे तारवटून लालभडक होत. स्वतःच्या शरिरावर त्याचा ताबा नव्हता. त्यामुळे बादशहा घाबरून गेला होता. गुलामाचे इतरांशी वाद वाढत होते.
तो खुनशी होत गेला. ७ ऑक्टोबरला त्याने यमुनेपलिकडून दिल्लीच्या किल्ल्यावर तोफा डागल्या. १२ गोळे किल्ल्यात आले. बादशहाने महादजी शिंदे यांना पत्र लिहिले; पण नझीर मंजूरअलीने ते रहित केले. त्यामुळे शिंद्यांचा प्रतिनिधी अंबाजी इंगळे परत फिरला. मराठी फौजा आता चंबळच्या जवळ होत्या. मराठ्यांच्या ताब्यातील बरीच ठाणी लालसोटच्या लढाईनंतर इतर अनेकांनी बळकावली होती; पण महादजीच्या सैन्याने इस्माईल बेग आणि गुलाम कादर यांचा मोठा पराभव आग्र्याला केला.
नझीर आणि गुलाम कादर पुन्हा दिल्लीत आले. बादशहाने महादजीला साहाय्याला बोलावले. तोवर एक दिवस अचानक गुलाम कादराने दिल्लीत हैदोस घालायला प्रारंभ केला. त्याने बादशाह शाहआलमचे डोळे काढून त्याला अदबखान्यात घातले. अजाण अर्भके आणि असाहाय्य स्त्रिया यांना उपाशी ठेवल्याने ती अन्नपाण्यावाचून तडफडू लागली. संपत्तीसाठी किल्ला खणला. बायकांना उन्हात गच्चीवर उभे केले आणि मारले. कित्येक नोकर-चाकर मारता-मारता मेले. किल्ल्याबाहेर श्रीमंतांच्या हवेल्या उलट्या-पालट्या केल्या. सावकार धरून पैसे काढून घेतले. राजघराण्यातील देखण्या बायकांची रोहिल्यांच्या वासनाकांडात आहुती पडली. सलग दोन मास गुलाम कादराचे पिसाट थैमान दिल्लीत चालू होते.
गुलाम मराठ्यांचा मोठा द्वेष्टा होता. मराठ्यांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी सैन्य उभे करण्यास बादशहाने भरपूर पैसा द्यावा; म्हणून गुलामने त्याच्यावर मोठा दबाव आणला. दिल्लीत त्याने जो हैदोस घातला त्याच्या बातम्या महादजीच्या कानावर आल्या. महादजीने आपली फौज दिल्लीकडे पाठवली. राणेखान, जिवबादादा, बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले. एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लूट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली. मराठी फौजांनी गुलाम कादराचा पाठलाग करण्यास प्रारंभ केला. गुलाम कादराने अहल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून साहाय्याची याचना केली; पण गुलामाच्या पापाचा घडा भरला होता. गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला. त्याच्या घोसगडाकडील रस्त्यावर मराठी फौजा आल्या. गुलाम तहाची बोलणी करावयास लागला. मराठ्यांना तो जिवंत हवा होता.
महादजीने २३ डिसेंबर १७८८ या दिवशी नाना फडणीसांना कळवले की, ‘गुलाम कादर याने बादशहाची बेकैद आणखी हरामखोरी केली. त्याचा नतीजा त्यास तसाच देऊन जिवंत धरून पारिपत्य करावे याकरिता फौजेने, पैक्याने आणि मेहनतीने जितके प्रयत्न होते तेवढे केले. त्याचे सार्थक श्रीमंताचे प्रतापे होऊन मार्गशीष वद्य ७ स (१९ डिसेंबर) गुलाम यास जिवंत धरला.’
गुलाम कादर शामलीजवळ मराठी सैन्याच्या हातात जिवंत सापडला. पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली. नाझीर खोजा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या. गुलामाची आई पंजाबात पळू पाहात होती, तिला पकडण्यास रायाजी आणि अलीबहादर गेले. घोसगड मराठी फौजांनी जिंकला आणि तोफा डागून जमीनदोस्त केला. गुलामाकडून जिनसांच्या याद्या करून घेण्यात आल्या. लूट जप्त करण्यात आली. गुलामाचे डोळे काढून बादशहाकडे पाठवण्यात आले. ३ मार्च या दिवशी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला. बादशाह शाहआलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. खर्च काढून इतर लूट महादजीने दिल्लीला पाठवली. मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता.
– ज्येष्ठ इतिहासंशोधक श्री. निनाद बेडेकर (संदर्भ : दैनिक पुढारी)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात