वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !


‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत. अशी अनेक गाणी इतिहासाची साक्ष देत मराठी माणसाच्या मनात रुजून बसली आहेत. सुपीक भूमीत जातीवंत बीज रुजते आणि फोफावते, त्याचप्रमाणे या गाण्यांनी मराठी माणसाच्या मनामनांत, नसानसांत वर्षानुवर्षे ठाण मांडले आहे.

ही गाणी म्हणजे करमणुकीचे साधन नसून मराठी मनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. त्यामुळेच प्रत्येक शुभप्रसंगी या गाण्यांची धून मराठी अंगणात घुमू लागते आणि प्रत्येकाच्या मनातील मराठ्यांच्या वीरश्रीच्या कहाण्या फेर धरू लागतात.

छत्रपती शिवरायांचा
तो सळसळता रणसंग्राम, धुरंधर राजकारणाचे आडाखे, तडाखे, मनसुबे आणि त्याच्या पूर्ततेसाठी मांडलेला डाव अन् योजना राबवतांना तळहातावर प्राण आणि डोळ्यांसमोर असणारी छत्रपतींची प्रेरक प्रतिमा अन् त्यांच्या स्वप्नीचे श्रींचे स्वराज्य हे सारे सारे या छोट्या छोट्या गीतांच्या ओळीत ठासून भरलेले इतिहासाचे चिरेबंदी सारच आहे. या गाण्यातून साकारलेली शिवप्रतिमा, त्यातून उमटलेला ‘हरहर महादेव’चा गजर, त्या पाठोपाठ दुमदुमणारा ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, हे सारे सारे वर्षानुवर्षे मराठी मनात ठसलेले शिवप्रेम, शिवनिष्ठा आणि शिवप्रेरणा यांमुळे शक्य झाले ! (‘राष्ट्रपर्व’, दिवाळी विशेषांक, २०११)


Leave a Comment