‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. सुट्टी म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाला सुंदर आकार देणारी आणि नवनवीन कलाकौशल्य शिकण्याची मुक्त शाळाच होय. यासुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘आपल्यात कोणत्या गोष्टींची उणीव आहे’, याचा अभ्यास करून त्या गोष्टींचा विकास करण्यासाठी आपल्याला देवाने दिलेली ही संधी आहे.
जो सतत शिकण्याच्या स्थितीत असतो, त्याला ‘विद्यार्थी’ म्हणतात. कोणत्या नातेवाइकांकडे कोणती शिकण्याची साधने आहेत, त्यांच्याकडे गेल्यावर आपण काय शिकू शकतो, याचा अभ्यास करायला हवा,उदा. मामाकडे संगणक आहे, तर तिथे मराठी टंकलेखन, तसेच संस्कार करणारी संगणकीय संकेतस्थळे कशी उघडतात, हे शिकावे. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो,शिकण्यातच खरा आनंद आहे.
१. शारीरिकदृष्ट्या विकास होण्यासाठीच्या कृती
अ. मैदानी खेळ खेळणे : खो-खो, कबड्डी आणि लंगडी असे खेळ खेळावेत, यामुळे व्यायाम होऊन शरीर निरोगी रहाते. तसेच संघभावना, तत्परता, प्रतिनिधीत्व करणे, इतरांचा विचार करणे, निर्णयक्षमतेचा विकास, इतरांचे ऐकणे इत्यादी गुण अंगी येतात.
आ. सूर्यनमस्कार घालणे : शरीर सक्षम रहाण्यासाठी प्रतिदिन सूर्यनमस्कार घालावेत.
इ. संगणकीय खेळ खेळू नका : काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खेळ न खेळता संगणकावर विकृत खेळ खेळायला आवडते. मित्रांनो, असे करू नका. त्याने आपली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हानी होते. तसेच शारीरिक आणि मानसिक दुर्बलता, शारीरिक व्यायाम न होणे, संकुचितपणा असे दुर्गुण अंगी येतात.
२. मानसिक विकास होण्यासाठीच्या कृती
मित्रांनो, आपण जसे वाचतो, तसे आपले विचार होतात आणि जसे आपले विचार असतात, तशीच कृती आपल्याकडून होते; म्हणून चांगले विचार होण्यासाठी चांगले ग्रंथ आणि पुस्तके यांचे वाचन करणेआवश्यक आहे.
अ. राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील पुस्तके अन् ग्रंथ यांचे वाचन करणे
१. देवदेवता आणि संत : श्रीकृष्ण, श्रीराम, श्री गणपति, श्री सरस्वती इत्यादी, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत सखुबाई, भक्त प्रल्हाद इत्यादींवरील ग्रंथवाचन करणे
२. शूर राजे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इत्यादी.
३. क्रांतिकारक : भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सावरकर, झाशीची राणी इत्यादी.
आ. काल्पनिक गोष्टी वाचू नका !
मित्रांनो, तुम्ही ‘वेळ जावा’, यासाठी काहीतरी वाचायचे;म्हणून काल्पनिक गोष्टी वाचता. वास्तवात ज्यांनी आदर्श जीवन प्रत्यक्षात जगून दाखवले आहे, त्यांच्या गोष्टीच आपण वाचायला हव्यात. काल्पनिक म्हणजे ज्याला वास्तवाचा कोणताच आधार नाही. मित्रांनो,आपल्याला यातून स्फूर्ती आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा कधीतरी मिळेल का ? तेव्हा मित्रांनो, तुम्ही‘टॉम अँड जेरी’ सारख्या काल्पनिक गोष्टी वाचाल कि वास्तविक आणि प्रेरणादायी गोष्टी वाचाल ?
या सुटीत देवदेवता, संत, राजे, तसेच क्रांतिकारक यांच्या गोष्टी वाचा, तरच आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होईल. यासाठी तुम्ही www.balsanskar.com या संकेतस्थळाचा वापर करा. या संकेतस्थळावर तुम्हाला पुष्कळ गोष्टी वाचायला मिळतील.
इ. मालिका आणि ध्वनीचित्र-चकत्या पहाणे
१. ‘स्टार उत्सव’ या दूरचित्रवाहिनीवरील श्रीकृष्ण आणि रामायण या मालिका पहाव्यात.
२. संत ज्ञानेश्वर अन् क्रांतिकारक यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ध्वनीचित्र-चकत्या घेऊन त्याआपण घरीही पाहू शकतो.
३. कार्टून, हत्या आणि मारामारी या विषयांवरील विकृत चित्रपट पाहू नका.
ई. चित्रे रंगवणे
मित्रांनो, सुटी असल्याने वेळ जावा; म्हणून कार्टून, तसेच मनाला सुचेल, ते चित्र तुम्ही काढता, त्यापेक्षा सात्त्विक चित्रे काढून पुढील विषयांवरील चित्रे रंगवावीत. कार्टूनमध्ये देवता आणिसंत यांची चित्रे रंगवू नका.
१. देवता : श्री गणपति, श्रीराम, हनुमान, श्रीकृष्ण, दत्त, शिव, दुर्गादेवी आणि लक्ष्मी
२. भक्ती जागृत करणारी : संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई, संत गोरा कुंभारआणि संत तुकडोजी महाराज
३. राष्ट्रप्रेम जागृत करणारी : भगतसिंग, झाशीची राणी आणि शिवाजी महाराज
४. सण : गणेशोत्सव, दीपावली आणि रंगपंचमी
३. स्तोत्रे आणि श्लोक यांचे पाठांतर करणे
रामरक्षा, हनुमान स्तोत्र, संकटनाशन स्तोत्र आणिमनाचे श्लोक यांच्या पाठांतरामुळे वाणी शुद्ध होणे, उच्चार सुधारणे, पाठांतराची सवय लागणे इत्यादीलाभ होतात.
४. प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, आम्हाला या सुटीचा उपयोग आमच्यात सद्गुण आणण्यासाठी करता येऊ दे.आमच्यातील दोषांची आम्हाला जाणीव होऊन तुला अपेक्षित अशीच प्रत्येक कृती आमच्याकडून होऊ दे.वरील प्रत्येक सूत्र आमच्या आचरणात येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी),पनवेल.
५. आई-बाबांना त्यांच्या कामात साहाय्य करून
त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेणे
‘तुमचे आई-बाबा वर्षभर तुमची शाळा आणि अभ्यास यांसाठी साहाय्य करत असतात. आई तिची सर्व कामे सांभाळून तुम्हाला डबा करून देणे, खाऊ करणे, अभ्यास घेणे इत्यादी कामे करत असते. सुटीमध्ये तुम्ही तिला तिच्या कामांमध्ये साहाय्य केले पाहिजे.
जे आई-बाबा आपल्यावर अनंत उपकार करतात, त्यांची आपण काळजी घेतली, तर त्यांच्याप्रती थोडीशी कृतज्ञता व्यक्त होईल.’
– सौ. सई अमरे, मुंबई