१. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदान यांच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञानाच्या म्हणजे परा विद्येच्या समवेतच व्यावहारिक, भौतिक ज्ञानाच्या म्हणजे अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले. गांधींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे ‘भारतातील शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे आणि चारित्र्य निर्माण करण्यात प्रखर अन् अत्यंत प्रभावी असून संपूर्ण देशात सुलभपणे उपलब्ध असणारे होते’, असे सिद्ध केले आहे.त्यांनी १८२३ मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे, ‘(ज्यांना आपण वंचित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा अन् विद्यापिठे यांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता.’
२. शिक्षण पद्धतीसुद्धा वैज्ञानिक होती. ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतींनुसार ‘माहितीची देवाण-घेवाण’ एवढ्यापुरतेच ज्ञान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार जे आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट घेतात आणि शिष्याचे संपूर्ण दायित्व ग्रहण करतात, ते म्हणजे गुरु. गुरु शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून त्याला मार्ग दाखवतात. इतकेच नव्हे, तर ते त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतातसुद्धा आणि आवश्यकता पडल्यास शिष्याचे बोट धरून त्याला कडेवरही उचलून घेतो. आजच्या विद्येच्या क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरा लोप पावली आहे. हे जीवनात आलेली पोकळी आणि निराशा यांचे मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धत पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
संदर्भ : विवेक विचार, जुलै २००९