देवाविषयी भाव निर्माण करा !

‘भाव’ म्हणजे देवाची मनापासून आठवण येणे किंवा त्याच्याविषयी प्रेम वाटणे. ‘भाव तेथे देव’, म्हणजेच भावाच्या ठिकाणी देव असतो. भाव असणार्‍यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो. भाव निर्माण झाल्यावर सातत्याने आनंद जाणवतो. मन स्थिर आणि शांत होऊ लागते. भाव निर्माण होण्यासाठी काय करावे ते पाहूया.

१. प्रार्थना

देवाला शरण जाऊन आपल्याला हवी असलेली गोष्ट तळमळीने याचना करून मागणे, याला प्रार्थना म्हणतात. आपल्याला काही हवे असल्यास ज्याप्रमाणे आपण प्रथम आईला हाक मारतो, त्याप्रमाणे देवता ही आपली आईच असल्याने तिला प्रार्थना केल्यास तिच्यापर्यंत आपली हाक पोहोचते आणि ती आपल्या साहाय्यासाठी येते.

अ. प्रार्थनेमुळे होणारे लाभ

१. प्रार्थनेमुळे चिंता अल्प होऊन देवावरील श्रद्धा वाढते आणि मन एकाग्र होते.

२. प्रार्थना केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो.

आ. प्रतिदिन करावयाच्या काही प्रार्थना

१. स्नानापूर्वी : हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे शरीर शुद्ध होण्यासह अंतःकरण निर्मळ होऊ दे आणि तुझे चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे.

२. अभ्यासापूर्वी : हे विघ्नहर्त्या आणि बुद्धीदात्या श्री गणेशा, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी तू मला सुबुद्धी आणि शक्ती दे.

३. अन्न ग्रहण करण्यापूर्वी : हे अन्नपूर्णामाते, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ या भावाने माझ्याकडून ग्रहण केले जाऊ दे. या प्रसादातून मला शक्ती आणि चैतन्य मिळू दे.

२. कृतज्ञता

‘एखादी गोष्ट मला देवामुळे मिळाली’ किंवा ‘देव माझ्यासाठी किती करतो’, असे वाटून त्याच्याविषयी मनात प्रेम आणि आदर निर्माण होणे, म्हणजेच कृतज्ञता. मुलांनो, तुम्ही घरी लेखणी (पेन) विसरल्यास शाळेत मित्राने तुम्हाला त्याची लेखणी दिली, तर ती परत देतांना तुम्ही त्याला ‘धन्यवाद’ म्हणता. मग देवाने आपल्याला जन्म देऊन हवा, पाणी, अन्न, जीवनावश्यक वस्तू, धडधाकट शरीर आणि बुद्धी इतके सगळे दिलेले आहे; म्हणून त्याविषयी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. ‘देवच आपल्यासाठी सर्व करतो’, असे वाटून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केल्याने मनात कोणत्याच गोष्टीचा अभिमान निर्माण होत नाही.

३. देवाशी बोलणे (आत्मनिवेदन)

भाव वाढवण्यासाठी मनातून देवाशी बोलावे. मनातील चांगले-वाईट विचार, जीवनातील चांगल्या-वाईट घटना, तसेच अडचणी यांविषयी देवाशी मनमोकळेपणाने बोलावे. देवाशी अशा प्रकारे बोलणे, यालाच ‘आत्मनिवेदन’ असे म्हणतात.

अ. देवाशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे

प्रारंभी मनातून देवाशी बोलणे कठीण वाटत असेल, तर तुमचा आवडता देव किंवा उपास्यदेवता यांपैकी कोणाचेही चित्र समोर घेऊन त्याला मनातील सर्व सांगावे. आपण जसे एखादा मित्र किंवा मैत्रीण यांच्याशी अगदी जवळीकतेने आणि सहजपणे बोलतो, तसे देवालाही आपला मित्र मानून त्याच्याशी बोलावे. प्रत्येक कृती करण्यापूर्वी ‘देवा, मी ही कृती कशी करू ? तुला कसे आवडेल ?’, असे विचारावे.

आ. देवाशी बोलल्याने होणारे लाभ

१. मनातून देवाशी बोलल्याने त्याच्याशी जवळीक होऊन त्याच्याविषयी प्रेम वाटून मन हलके होते.

२. देव सतत समवेत आहे, याची आपल्याला जाणीव होते.

३. आपण देवाशी जे बोलतो, ते तो सर्व ऐकत असतो आणि त्यानुसार तो अडचणीत आपल्याला योग्य मार्गही दाखवतो.

मुलांनो, अशा प्रकारे प्रार्थना, कृतज्ञता आणि देवाशी बोलणे सातत्याने होऊ लागल्यावर तुमच्यातील भाव वाढेल अन् देव तुमच्या हाकेला ‘ओ’ देऊन तुमच्या रक्षणासाठी लगेच धावून येईल.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ, ‘प्रार्थना‘.

Leave a Comment