‘भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापण्याच्या उद्देशाने सर थॉमस मूनरो या ब्रिटिश अधिकार्याने त्या काळी भारताच्या शैक्षणिक स्थितीचे खोलवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून प्राचीन काळात असलेले भारताचे शैक्षणिक वैभव दिसून येते.
१. सर थॉमस यांचे सर्वेक्षण
१ अ. बंगाल आणि बिहार येथील १ लक्ष ५० सहस्र ७४८ गावांतील शाळा : १ लक्ष
१ आ. वर्ष १८२६ पर्यंत मद्रास प्रांताच्या २१ जिल्ह्यांतील उच्च शिक्षणसंस्था : १०६४
१ इ. बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या उच्च शिक्षणसंस्था : सरासरी १००
मुंबई आणि पंजाब या प्रांतांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्षही वरीलप्रमाणेच होता.
२. प्राचीन भारतातील शिक्षणाची वैशिष्ट्ये !
२ अ. समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे : ‘पूर्वीच्या काळी शिक्षणासाठी अस्तित्वात असलेली गुरुपरंपरा ही अतीप्राचीन आणि श्रेष्ठ परंपरा असल्याने शिक्षणाची गुणवत्ता (स्तर) उच्चप्रतीची होती. शिक्षण संस्थांचा उद्देश ‘समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे’, हा होता; म्हणून शिक्षण संपल्यानंतर शिक्षणसंस्था पदवीदान समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक योग्यतेप्रमाणे त्यांचा वर्णव्यवसाय निश्चित करत असत. परंपरागत व्यवसायाचे शिक्षण कुटुंबामध्येच मिळत असे.
२ आ. सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान : पूर्वी शाळांमध्ये धर्मशास्त्र, विधी, ज्योतिषशास्त्र यांसारखे सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान दिले जात असे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्याच्यामध्ये शिक्षणानंतर एक चांगला नागरिक बनण्याची क्षमता विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जात असे. त्यासाठी विद्यार्थ्याच्या निवासाची सुविधाही शाळेतच असायची.
२ इ. शिक्षण हे समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करण्याचे माध्यम : शिक्षण हे उदरभरण किंवा अर्थार्जन करण्याचे माध्यम नव्हते. प्रत्येक व्यक्ती स्वतःची पूर्ण क्षमता वापरून समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करत असे; म्हणून कोणत्याही व्यवसायात भ्रष्टाचार, संग्रह करणे किंवा भेसळ इत्यादींचा प्रश्नच उद्भवत नव्हता.’
२ ई. शिक्षणाची आर्थिक बाजू सांभाळणारे राजे आणि त्याची योग्य परतफेड करणारे विद्यार्थी : वैदिक काळापासून राजे-महाराजे आणि शीर्ष स्थानावर असलेले महाजन जागरूकतेने अन् क्रियाशीलतेने शिक्षण व्यवस्थेचा व्यय करत असत. एखाद्या शिक्षणसंस्थेला आर्थिक साहाय्य करणे, हे ऋषीऋणातून मुक्त होण्याचे पुण्यकर्म मानले जात होते. त्यामुळे शिक्षण संस्था राजाच्या अर्थसाहाय्याने चालायच्या; मात्र त्या राजाश्रित नव्हत्या.’
संदर्भ :मासिक गीता स्वाध्याय’, जानेवारी २०११