बालमित्रांनो, या लेखात स्वभाव कसा ठरवला जातो, स्वभावातील गुण-दोषांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, दोषांमुळे किती हानी होते, याविषयी आपण जाणून घेऊया.
१. स्वभाव कसा ठरवला जातो ?
व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून तिचा स्वभाव ठरतो. एखादा मुलगा स्वतःच्या वस्तू मित्रांना वापरायला देत असेल, तर ‘तो इतरांना साहाय्य करणारा आहे’, असे म्हटले जाते. एखादा मुलगा लहानसहान कारणावरून रागावत असेल, तर त्याला ‘रागीट’ स्वभावाचा म्हणतात. एखादी मुलगी सांगितलेले लहान-मोठे काम विसरत असेल, तर तिला ‘विसराळू’ स्वभावाची म्हणतात. थोडक्यात मुला-मुलीच्या वागण्या-बोलण्यावरून त्याचा किंवा तिचा स्वभाव ठरवला जातो.
२. स्वभावातील गुण-दोषांचा काय परिणाम होतो ?
मुलाच्या (किंवा मुलीच्या) स्वभावातील गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो, तर त्याच्या स्वभावातील दोषांमुळे त्याच्यापासून सर्व जण दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. स्वभावातील गुणांमुळे मुले आनंदी राहू शकतात, तर दोषांमुळे मुले दुःखी होतात. स्वभावातील गुण-दोषांमुळे आपल्या आयुष्यात चांगले-वाईट परिणाम कसे होतात, हे आपण पहिले. आता आपण या परिणामांमुळे कशी हानी होऊ शकते, ते पाहूया.
३. स्वभावदोषांमुळे मुलांची होणारी सर्वसाधारण हानी
स्वभावदोषांचे प्रमाण जास्त असलेल्या मुलांच्या जीवनात मानसिक तणाव वाढवणारे आणि दुःख देणारे अनेक प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे मुले निराश आणि दुःखी होतात. या व्यतिरिक्त त्यांची कशा प्रकारे हानी होऊ शकते, हे पुढील काही उदाहरणांवरून लक्षात येईल.
अ. शालेय जीवनाच्या संदर्भातील हानी
१. मुलांची अभ्यासातील एकाग्रता घटते.
२. त्यांचा आत्मविश्वास उणावतो.
३. त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण होत नाही.
४. त्यांचे मित्र-मैत्रिणींशी पटत नाही.
आ. अन्य हानी
१. मुले एकलकोंडी आणि स्वार्थी बनतात.
२. मुले चिडचिडी आणि रागीट बनतात.
३. अशी मुले व्यसनाधीन होण्याची शक्यता अधिक असते.
४. ही मुले वाईट संगतीला लागून चोरी करणे, गुंडगिरी करणे अशा प्रकारचे वर्तन करतात.
बालमित्रांनो, आजच्या लेखातून समजले असेल की, आपल्या स्वभावातील दोषांमुळे आपली किती हानी होऊ शकते ! ते घालवण्यासाठी आपण आजपासून नव्हे, तर आतापासूनच प्रयत्न करूया.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’