बालमित्रांनो, आता आपण स्वयंसूचना ‘पद्धत -३’ प्रमाणे कशी बनवायची, हे जाणून घेऊया.
१. स्वयंसूचना पद्धत ३ : प्रसंगाचा सराव करणे
अ. स्वयंसूचना पद्धतीची उपयुक्तता
या पद्धतीत मुलगा / मुलगी काही वेळ नामजप करून मन स्थिर करतो / करते. नंतर ‘कठीण वाटणार्या प्रसंगाला स्वतः यशस्वीरित्या तोंड देत आहोत’, अशी कल्पना करतांना मुलगा / मुलगी त्या प्रसंगाला तोंड द्यायचा मनातल्या मनात सराव करतो / करते. यामुळे पुढे प्रत्यक्ष घटनेच्या वेळी मुलाच्या / मुलीच्या मनावर ताण न येता त्याला / तिला आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरे जाता येते. या सूचनेमध्ये सकारात्मक किंवा आपल्याला जसे अपेक्षित आहे तसेच घडत आहे, अशी कल्पना करायची असते. सूचनेत कल्पना केल्याप्रमाणे जरी प्रत्यक्षात घडले नाही, तरी सूचना दिल्यामुळे प्रसंगाला सामारे जाण्यासाठी मन सक्षम बनते. सूचनेची शेवटची ओळ सर्वसाधारणतः अशी असावी – मला ज्या गोष्टींची काळजी होती, तसे काही झाले नाही; म्हणून मी पुढच्या वेळी आत्मविश्वास बाळगीन. एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणार्या प्रसंगातील अयोग्य प्रतिक्रिया टाळण्यासाठी ही पद्धत वापरतात.
आ. स्वयंसूचना पद्धतीमुळे मात करता येणारे स्वभावदोष
‘प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येतील का’, अशी काळजी वाटणे; तोंडी परीक्षा, वार्तालाप (मुलाखत), वक्तृत्व स्पर्धा इत्यादी प्रसंगांची भीती वाटणे आदी.
स्वयंसूचना बनवण्यास शिकण्यासाठी आपण काही प्रसंगांचा अभ्यास करूया.
प्रसंग – कु. सदानंदला पुढील आठवड्यात (सोमवारी) असणार्या इतिहासाच्या परीक्षेची भीती वाटत आहे.
स्वभावदोष – भीती वाटणे
स्वयंसूचना – सदानंदने पुढील सूचनांचा मनातल्या मनात सराव करावा – ‘सोमवारी इतिहासाची परीक्षा आहे. माझी सिद्धता (तयारी) झाली आहे. मी इतिहासाची टाचणे शांतपणे चाळत आहे. आता ‘कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकेन’, असे मला वाटत आहे. मी परीक्षागृहात वेळेवर पोहोचत आहे. पहिली घंटा वाजत आहे. मी शांतपणे माझ्या स्थानावर डोळे मिटून बसत आहे. आता दुसरी घंटा वाजत आहे. शिक्षक माझ्या हातात प्रश्नपत्रिका देत आहेत. प्रत्येक प्रश्न आणि त्याचे गुण पाहून ‘मी कोणते प्रश्न सोडवणार आहे’, याचा विचार मी करत आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोपे आहेत. माझ्याकडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समाधानकारक लिहिले जात आहे. शेवटची १० मिनिटे राहिल्याची घंटा वाजत आहे. मी उत्तरपत्रिकेची सर्व पाने चाळून ‘सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे लिहिली आहेत का’, याची निश्चिती करून घेत आहे. शेवटची घंटा वाजत आहे. मी उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांच्या हातात देत आहे. मी आता घरी आलो आहे आणि घरातील सर्वांना ‘आजची प्रश्नपत्रिका सोपी होती’, असे सांगत आहे. ‘आजची प्रश्नपत्रिका सोपी गेल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी आता विश्रांती घेईन आणि नंतर उद्याच्या विषयाच्या अभ्यासाला जोमाने आरंभ करीन’, असा विचार करून मी पलंगावर झोपत आहे.
बालमित्रांनो, कठीण प्रसंगामध्ये घाबरून न जाता पद्धत – ३ प्रमाणे स्वयंसूचना देऊन देवाला अपेक्षित असे मनाला सक्षम बनवूया !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’