कारंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंज ऋषींनी ठेवले. पूर्वी या गावाला करंजनगरी म्हणून ओळखत. या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष होते. म्हणून या करंज ऋषींनी हातात कुदळ घेवून तलाव खोदण्यास सुरूवात केली. त्याच वेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ येथे आला. त्यांनी आपआपल्या कमंडलूतील जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला. हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो. ही करंज नगरी जैनांची काशी म्हणून ओळखली जाते. येथे तीन जैन मंदीरे आणि एक जैन गुरूकुल आहे. परंतु हे कारंजा गांव भगवान दत्ताचा व्दितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते.
करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनित झालेली ही कारंज नगरी भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासीयांना अज्ञातच होते. स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा व्दितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन प.पू. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले. प.पू. ब्रम्हानंद स्वामी पूर्वाश्रमीचे लीलावत होते. त्यांना श्री नृसिंह स्वामी महाराजांची मूर्ती तयार करुन मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती, हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते. परंतु असे सांगतात की, प्रत्यक्ष महाराजांनी प.पू. ब्रम्हानंद स्वामींना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या, त्यामध्ये काहीही पालट करु नये, आपणास काही कार्य करायचे असेल तर आमचे जन्मस्थान व-हाडात कारंजा येथे आहे. त्या ठिकाणी आपणास जे करायचे असेल ते करा. त्यानंतर प.पू. ब्रम्हानंद सरस्वती महाराज आणि प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली असता श्रीं चे जन्मस्थान कारंजालाच आहे ही गोष्ट प.पू. ब्रम्हानंद श्री वासुदेवानंद स्वामींनी प.पू. ब्रम्हानंद स्वामींना स्पष्ट केली, त्याप्रमाणे प.पू. ब्रम्हानंद स्वामी कारंजास आहे.
प.पू. ब्रम्हानंदांनी ‘श्रीं’ ची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजास आणण्यात आली. मंदिर तयार झालेलेच होते. त्यामुळे चैत्र वद्य व्दितीयेला २१ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे. त्या पादुका काशी क्षेत्रातून प.पू. ब्रम्हानंद स्वामींनी कारंजास आणल्या व विधीवत त्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली. या पादुका सकाळी गंधलेपनाकरीता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देव्हा-यात ठेवल्या जातात. या पादुकांना अत्तर, केशर यांचे गंधलेपन नियमीतपणे होत असते. तसेच या संस्थेचा कार्यक्रम कशा प्रकारचा असावा हे प.पू. ब्रम्हानंद स्वामींनी ठरवून दिले आहे. सकाळी साडेपाचला काकड आरती, त्यानंतर महाराजांना लघुरुद्र व पंचोपचार पूजा, त्यानंतर सत्यदत्त पूजा. सायं. पुजा. पंचपदी, रात्री साडे आठला आरती अन् त्यानंतर अष्टके व शंखोवक होऊन इतर काही कार्यक्रम नसल्यास शेजारती होते आणि नंतर कपाट बंद होते. कुठल्याही परिस्थीतीत कपाटे दुस-या दिवशीच्या काकड आरती पर्यंत उघडले जात नाही. या ठिकाणच्या पुजा-याला त्रिकाल स्नान करुन गाभा-यात जावे लागते. तेही त्यांनी घरुन स्नान करुन आलेले चालत नाही. आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे. तेथेच स्नान करुन नंतर ते आपआपल्या कामी लागतात. पुजा-याशिवाय कोणालाही ‘श्रीं’ च्या गर्भगृहात प्रवेश नाही. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. याचा प्रत्यय विविध मंडळास वारंवार येत असतो.
Really interesting. Thanks for the information.