१. कोलकाता विश्वविद्यालयाचे उपकुलगुरु देऊ इच्छित असलेली ‘डॉक्टरेट’ची पदवी नम्रपणे नाकारणे
‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते. ते जितके उदार, विनम्र, निराभिमानी आणि मृदू होते, तितकेच संयमी, खंबीर, स्वाभिमानी आणि अविचल योद्धासुद्धा होते. त्यांच्या जीवनात हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयीचा स्वाभिमान ठासून भरलेला होता.
एकदा कोलकाता विश्वविद्यालयाच्या उपकुलगुरूंनी मालवीयजींच्या कार्यावर प्रसन्न होऊन त्यांना एक पत्र पाठविले.
मालवीयजी (पत्र पाहून गोंधळात पडून काहीसे पुटपुटले) : हा तर भलताच प्रस्ताव मांडला आहे. काय सांगू ? काय लिहू ?
एक मित्र : पंडितजी, अशी कोणती भलतीच गोष्ट लिहिलेली आहे ?
मालवीयजी : कोलकाता विश्वविद्यालयाचे उपकुलगुरु महोदय माझी सनातन पदवी हिरावून एक नवी पदवी देऊ इच्छितात. या पत्रात लिहिलेले आहे की, कोलकाता विश्वविद्यालय तुम्हाला ‘डॉक्टरेट’च्या पदवीने अलंकृत करून सन्मानित करू इच्छिते.
एक सज्जन (हात जोडून) : प्रस्ताव तर योग्यच आहे. तुम्ही ‘नाही’ म्हणू नका. ही तर आम्हा वाराणसीच्या जनतेसाठी विशेष गर्वाची गोष्ट आहे.
मालवीयजी : तुम्ही तर फारच भोळे आहात भाऊ ! यामुळे वाराणसीचा गौरव वाढणार नाही. हा तर वाराणसीच्या पांडित्याला अपमानित करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यांनी लगेच या पत्राचे उत्तर लिहिले, ‘माननीय महोदय ! आपण ठेवलेल्या प्रस्तावाविषयी धन्यवाद ! माझ्या उत्तराला आपल्या प्रस्तावाचा अनादर न मानता आपण त्यावर पुन्हा एकदा विचार करावा. आपला हा प्रस्ताव मला निरर्थक वाटत आहे. मी जन्म आणि कर्म या दोघांनी ब्राह्मण आहे. जो ब्राह्मण धर्माच्या मर्यादांचे पालन करीत जीवन जगतो, त्याच्यासाठी ‘पंडित’ या पदवीहून दुसरी कोणतीही पदवी श्रेष्ठ असू शकत नाही. मी ‘डॉक्टर मदनमोहन मालवीय’ म्हणवून घेण्यापेक्षा ‘पंडित मदनमोहन मालवीय’ म्हणवून घेणे अधिक पसंत करीन. आशा करतो की, आपण या ब्राह्मणाच्या मनातील भावनेचा आदर करीत मला ‘पंडित’च राहू द्याल.’
२. पंडित मालवीय यांना व्हॉईसरॉयने ‘सर’ ही पदवी देण्याची इच्छा व्यक्त केल्यावरही त्याचा स्वीकार न करता ईश्वराने दिलेली ‘पंडित’ ही पदवीच ठेवणे
मालवीयजींची कार्य करण्याची शैली अत्यंत मधुर आणि सुलभ होती. त्यांचा सहकार्य करण्याचा स्वभाव आणि इतर सद्गुण यांमुळे टीकाकारही त्यांचा आदर करत असत. मालवीयजी वृद्धावस्थेत तत्कालीन व्हॉईसरॉयच्या परिषदेचे वरिष्ठ अधिकारी (काउंसिलर) असतांना त्यांच्या गूढ आणि तथ्यपूर्ण टीकेनंतरही व्हॉईसरॉयने एके दिवशी त्यांना म्हटले, ‘‘पंडित मालवीय, हिज मॅजेस्टीचे (इंग्रज) सरकार तुम्हाला ‘सर’ या पदवीने सन्मानित करू इच्छिते.’’
मालवीयजी हसत म्हणाले, ‘‘तुम्ही मला याच्या योग्य मानत असल्याविषयी तुम्हाला पुष्कळ धन्यवाद ! परंतु मी वंशपरंपरेने मिळालेल्या या सनातन पदवीचा त्याग करू इच्छित नाही. मला ‘पंडित’ ही पदवी ईश्वराने दिली आहे. मी तिचा त्याग करून त्याच्या सेवकाने दिलेल्या पदवीचा स्वीकार का करू ?’’
संदर्भ : मासिक ‘ऋषीप्रसाद’, डिसेंबर २०११