१. जटीलला दिवसा शाळेत जाण्यात अडचण नसणे आणि शाळा सुटल्यावर घरी परततांना निर्मनुष्य मार्गावरून श्वापदांचा वावर असलेल्या रानातून येतांना भीती वाटणे
‘एका गावात एक विधवा स्त्री रहात असे. तिला एक जटील नावाचा मुलगा होता. तोच तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. तिला ‘त्याने पुष्कळ शिकावे आणि नाव कमवावे’, असे मनापासून वाटायचे. त्या वेळी त्यांच्या गावात शाळा नव्हती; म्हणून तिने त्याला शेजारच्या गावातील शाळेत घातले होते. ते गाव त्यांच्या वस्तीपासून बरेच दूर होते.
जटीलला अभ्यासाची फारच आवड होती. त्याचे गुरुजी प्रेमळ होते आणि शाळेतील सवंगडीही मनमिळाऊ होते. त्यामुळे तो आनंदाने शाळेत जाई. त्याला दिवसा जाण्यात काहीच वाटत नसे; पण शाळा सुटल्यावर घरी परततांना मात्र वाटेत रान लागायचे. निर्मनुष्य मार्गावरून श्वापदांचा वावर असलेल्या रानातून येतांना त्याला भीती वाटायची. त्या वेळी तो बापडा जीव मुठीत घेऊन कसाबसा घर गाठायचा.
२. जटीलने भीती वाटत असल्याचे आईला सांगितल्यावर तिने गोपाळदादाला (श्रीकृष्णाला) हाक मारायला सांगणे
एके दिवशी त्याला रहावले नाही. त्याने रडत रडत आपली भीती आपल्या आईला सांगितली. ती ऐकून तिलाही अश्रू आवरेनात. दिवसभर दुसर्याकडे पोटासाठी राबणारी ती गरीब बाई मुलाला आणायला कशी जाणार ?; पण तिने धीर सोडला नाही. जटीलच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ती त्याला म्हणाली, ‘‘बाळ, या जगात ज्याला कोणी नाही, त्याला देवच सांभाळतो. त्याचे रक्षण करतो. तू ज्या रानातून जातोस, तेथे तुझा गोपाळदादा रहातो. तुला भीती वाटली, तर त्याला हाक मार. तोच तुला सोबत करील.’’
३. रानातून परतत असतांना वाघाची डरकाळी ऐकू आल्याने त्याने गोपाळदादाला हाक मारणे आणि भगवान श्रीकृष्ण गोपाळ स्वरूपात तेथे प्रकट होऊन त्याने त्याला गावापर्यंत सुखरूप सोडणे
लहानग्या जटीलचा आपल्या आईच्या बोलण्यावर विश्वास बसला. पुढे काही दिवसांनी तिन्ही सांजेच्या वेळी तो रानातून परतत असतांना त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. ती ऐकताच तो भीतीने गारठला. काय करावे, हेच त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला आईचे शब्द आठवले आणि तो जिवाच्या आकांताने ओरडला, ‘गोपाळदादा धाव, आता तूच माझे रक्षण कर.’ काय आश्चर्य ! जटीलची मातृवचनावरील श्रद्धा दृढ करण्यासाठी स्वयंमेव भगवान श्रीकृष्ण गोपाळ स्वरूपात तेथे प्रकट झाला. त्याने त्याला गावापर्यंत सुखरूप सोडले. त्यानंतर ‘रान आले की, जटीलने हाक मारावी आणि गोपाळने तेथे येऊन त्याला सोबत करावी’, हा प्रतिदिन उपक्रम झाला. त्याच्या आईला ही गोष्ट ठाऊक नव्हती. ‘जटील न घाबरता प्रतिदिन शाळेत जातोय’, याचेच तिला समाधान वाटायचे.
४. शाळेत जातांना गोपाळदादाने वाटीभर दूध आणून देणे, मुलांनी थट्टा केल्यावर भगवंतास वाईट वाटून त्याने चमत्कार करणे, गुरुजींनी वाटीतील दूध ओतल्यावर ती पुन्हा भरणे आणि घरातील सर्व भांडी भरूनही वाटीतील दूध न संपल्याने गुरुजींनी त्याची क्षमा मागून सत्य स्थिती विचारणे
एकदा गुरुजींकडे काही धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला घरून थोडे थोडे दूध आणायला सांगितले. ते ऐकून जटीलला प्रश्न पडला. घरच्या दारिद्र्यामुळे तो दूध कोठून आणणार ? त्याने आपली व्यथा गोपाळदादाला सांगितली. दुसर्या दिवशी शाळेत जातांना गोपाळदादाने त्याला वाटीभर दूध आणून दिले.
जटील शाळेत गेला, तेव्हा त्या वाटीभर दुधाकडे पाहून सर्वांनीच त्याची थट्टा केली. त्यामुळे त्यास रडू आले. ते पाहून भगवंतास फारच वाईट वाटले. आपल्या प्रिय भक्ताची बाजू राखण्यासाठी त्याने एक चमत्कार केला. त्यामुळे गुरुजींनी ज्या वेळी त्याच्या वाटीतील दूध ओतले, तेव्हा वाटी पुन्हा भरलेली दिसली. गुरुजींच्या घरातील सगळी भांडी दुधाने भरली, तरी वाटीतील दूध संपेना.
तो चमत्कार पाहून गुरुजींनी त्याची क्षमा मागून सत्य स्थिती विचारून घेतली. त्यानंतर ते स्वतः गोपाळदादाला भेटायला आले; पण तो भेटला नाही. देव श्रद्धावंतांनाच भेटतो हेच खरे !’
संदर्भ : साप्ताहिक ‘जय हनुमान’, १६.२.२०१३