१. तामिळ महाकवी कंबन आणि त्याचा मित्र ओटूक्कूत्तन यांनी स्वतंत्रपणे तामिळ भाषेत रामायणाची रचना करणे : कंबन हा तामिळनाडूमधील महाकवी होता. तो प्रतिभावान आणि सूक्ष्मदर्शी विद्वानही होता. त्याला ओटूक्कूत्तन नावाचा मित्र होता. तोही मोठा विद्वान होता. कंबन रामायण रचतो आहे, हे समजल्यावर कूत्तनलाही स्फूर्ती आली आणि त्यानेही तामिळमध्येच रामायण रचनेला प्रारंभ केला. दोघांचीही रामायणे स्वतंत्रपणे चालू झाली आणि यथावकाश ती पूर्णही झाली.
२. कंबनचे रामायण लोकप्रिय होणे : कंबनचे रामायण लोकप्रिय झाले. कंबन आपले रामायण गायला लागला की, श्रोते तल्लीन व्हायचे आणि वाहवा करायचे. कंबन जाईल तेथे त्याचा आदर व्हायचा, सन्मान मिळायचा. सगळीकडे त्याचाच जयजयकार होता.
३. कूत्तनचे रामायण लोकप्रिय न झाल्याने त्याने निराश होऊन स्वतः रचलेले रामायण जाळून त्याची राख अंगाला लावून गोसावी होण्याचे ठरवणे : कूत्तन आपले रामायण गायला बसला की, श्रोते नगण्यच असायचे. त्यामुळे कूत्तन हिरमुसला व्हायचा. त्याला आपले सारे श्रम वाया गेले, असे वाटायचे. आपण उपेक्षित अवस्थेत जगणार अन् शेवटी मरणार ! असा विचार करता करता त्याचे डोके सैरभैर झाले. त्याच्या जीवनात सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. मग एके दिवशी कूत्तनने स्वतःच रचलेले रामायण जाळून त्या रामायणाची राख अंगाला फासून गोसावी बनण्याचे ठरवले
४. कूत्तन स्वतःने रचलेले रामायण जाळत असतांना कंबनने तेथे पोहोचणे आणि त्याने मित्राचा हात पकडून त्याला थांबवणे अन् त्याच्या रामायणातील जळण्यापासून वाचलेले उत्तराकांड स्वतःकडे घेणे : ही वाईट बातमी कंबनच्या कानी गेली. तो धावतपळत मित्राकडे पोहोचला. त्याने पाहिले, तेव्हा कूत्तन स्वतःच रचलेल्या रामायणाच्या पोथीचा स्वाहाकार करत होता. कंबन म्हणाला अरे वेड्या, हा काय प्रकार चालवला आहेस ? स्वतः रचलेले रामायण असे का जाळत आहेस ? त्यावर कूत्तन म्हणाला, तुझ्यापुढे मी काजवा आहे. माझ्या रामायणाला कोणीही विचारणार नाही. ते धूळ खात पडेल. त्यापेक्षा ते जाळलेले बरे ! कंबनने कूत्तनचा हात पकडला. तेव्हा कूत्तनच्या रामायणातील उत्तरकांड तेवढे जाळायचे राहिले होते. कंबनने ते स्वतःकडे घेतले.
५. कंबनने कूत्तनच्या रामायणातील उत्तराकांडाने स्वतःच्या रामायण काव्याची पूर्तता करणे आणि दोघांनी मिळून पूर्ण केले, असे जगाने म्हणावे, असा मित्रप्रेमाचा आदर्श जगापुढे ठेवणे : कंबन कूत्तनला म्हणाला, वेड्या, तू माझा मित्र ना ! हा स्वाहाकार करायच्या आधी मला बोलायचेस तरी ! आता मी सांगतो ते ऐक. तुझे रामायण लिहून पूर्ण झाले आहे. माझ्या रामायणाचे उत्तरकांड अजून रचायचे आहे. ते मी आता रचणार नाही. माझ्या रामायणाला तुझे हे उत्तरकांड जोडीन, म्हणजे रामायण पूर्ण होईल. लोक तुला आणि मला रामायणकर्ते म्हणून ओळखतील ! मित्रप्रेमाचा हा एक आदर्श ठरेल !!
(संदर्भ : साप्ताहिक जय हनुमान (ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११५ (६.७.२०१३))