गुरुदेव द्रोणाचार्ययांच्या विशेष कृपेला सर्वतोपरी पात्र असलेला शिष्य अर्जुन !
१. द्रोणाचार्यांच्या काही शिष्यांना अर्जुन खटकत असणे आणि गुरुदेवांनी अर्जुनाला धोतर आणण्यासाठी आश्रमात पाठवणे : अर्जुनावर गुरुदेवांची विशेष कृपा आहे, असे द्रोणाचार्यांच्या काही शिष्यांना वाटत असे. त्या सर्वांना अर्जुन खटकत असे. एकदा द्रोणाचार्य अर्जुनासह आपल्या शिष्यांना घेऊन नदीकाठी स्नानास गेले आणि एका वटवृक्षाखाली उभे राहून म्हणाले, अर्जुना, मी आश्रमात माझे धोतर विसरून आलो आहे ते घेऊन ये.
२. शिष्यांना मंत्रशक्तीचे महत्त्व समजावण्यासाठी गुरुदेवांनी एक अभिमंत्रित बाण वटवृक्षाच्या पानांवर सोडणे आणि तो बाण एकेक पान छेदत जाणे : गुर्वाज्ञा म्हणून अर्जुन धोतर आणण्यासाठी आश्रमात गेला. त्या वेळी गुरु द्रोणाचार्य इतर शिष्यांना म्हणाले, गदा आणि धनुष्य यांत शक्ती असते; परंतु मंत्रामध्ये यांपेक्षा अनंत पटींनी अधिक शक्ती असते. मंत्रजप करणार्याने त्याचे माहात्म्य आणि विधी समजून घेतला, तर मंत्रात अधिक सामर्थ्य असल्याचे लक्षात येईल. मी अभिमंत्रित अशा एकाच बाणाद्वारे या वटवृक्षाच्या सर्व पानांना छेदू शकतो. असे म्हणून द्रोणाचार्यांनी भूमीवर एक मंत्र लिहिला आणि त्या मंत्राने अभिमंत्रित करून एक बाण सोडला. बाण एकेक पान छेदत गेला. ते पाहून सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले.
३. परतलेल्या अर्जुनाचे लक्ष झाडाच्या पानांकडे जाऊन त्याला जिज्ञासा वाटणे आणि भूमीवर लिहिलेला वृक्षच्छेदनाचा मंत्र वाचून त्याने त्याचा प्रयोग करणे, त्यामुळे पानांना आणखी एक छेद पडणे : नंतर गुरु द्रोणाचार्य सर्व शिष्यांसह स्नानासाठी गेले. एवढ्यात अर्जुन धोतर घेऊन परत आला. त्याची दृष्टी झाडाच्या पानांकडे गेली. तो विचार करू लागला, या वटवृक्षाच्या पानांवर अगोदर छेद नव्हते. मी सेवेसाठी गेलो असतांना गुरुदेवांनी या शिष्यांना एखादे रहस्य शिकवलेले आहे. रहस्य शिकवलेले आहे, तर त्याचे काही सूत्र, प्रारंभ आणि एखादे चिन्हसुद्धा असेल. अर्जुनाने इकडे तिकडे पाहिले, तर त्याला भूमीवर एक मंत्र लिहिलेला दिसला. वृक्षच्छेदनाचे सामर्थ्य असणारा हा मंत्र अद्भूत आहे, असे त्याच्या मनात आले. त्याने तो मंत्र वाचून धारण केला आणि माझा हा मंत्र निश्चितच यशस्वी होईल, असा दृढनिश्चय केला. अर्जुनाने बाण उचलला आणि मंत्राचा उच्चार करून तो सोडला. वटवृक्षाच्या पानांवर एकेक छेद होताच, अर्जुनाच्या बाणामुळे दुसराही छेद दिसू लागला. हे पाहून अर्जुनाला आनंद झाला. गुरुदेवांनी त्यांना जी विद्या शिकवली ती मीसुद्धा आत्मसात केली, असा विचार करून तो गुरुजींना धोतर देण्यासाठी नदीकाठी गेला.
४. द्रोणाचार्यांनी पानांवरील आणखी एक छेद पाहिल्यावर सर्वांना प्रश्न विचारणे : स्नान करून आल्यावर द्रोणाचार्यांसह सर्वांनी पाहिले, वृक्षाच्या पानांना तर एकेकच छेद होता, आता दुसरा कोणी केला ?
द्रोणाचार्य : दुसरा छेद तुमच्यापैकी कोणी केला का ?
सर्व जण : नाही.
द्रोणाचार्य (अर्जुनाला) : तू केलेस का ?
(अर्जुन थोडा घाबरला; परंतु खोटे कसे बोलणार; म्हणून म्हणाला)
अर्जुन : मी तुमच्या आज्ञेविना तुमच्या मंत्राचा प्रयोग केला; कारण मला वाटले की, तुम्ही या सर्वांना ही विद्या शिकवलीच आहे, तर मग तुम्हाला विचारून तुमचा वेळ न घेता स्वतःच शिकून घ्यावे. गुरुदेव, चूक झाली असेल, तर मला क्षमा करावी.
द्रोणाचार्य : नाही अर्जुना, तुझ्यात जिज्ञासा, संयम आणि शिकण्याची तळमळही आहे, तसेच मंत्रावर तुझा विश्वासही आहे. मंत्रशक्तीचा प्रभाव पाहून हे सर्व जण केवळ चकित होऊन स्नानासाठी निघून गेले. यांच्यापैकी एकानेही दुसरा छेद घेण्याचा विचारही केला नाही. तू धैर्य दाखवलेस, प्रयत्न केलास आणि यशस्वीही झालास. तू माझा सत्पात्र शिष्य आहेस. अर्जुना, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होणे अवघड आहे.
शिष्य असा जिज्ञासू असावा की, गुरूंचे अंतःकरण उचंबळून यावे !
संदर्भ : मासिक ऋषी प्रसाद, मे २००३