गुरु-शिष्याची गोष्ट
एक शिष्य गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन म्हणून करत असतो. त्यामुळे गुरु त्या शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात. या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो.
काही कालावधीनंतर दुसरा एक कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूंचे मन जिंकतो. त्याच्या बुद्धीला चालना मिळावी; म्हणून गुरु उत्तराधिकारपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला त्यांचे उत्तराधिकारी नेमतात. तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल, अशी करत असतो.
काही दिवसांनतर उत्तराधिकारी केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो. परिणामी सहसाधक त्याच्या ऐवजी स्वयंपाकगृहात सेवा करणार्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ लागले. हे पाहून त्या उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते.
एक दिवस तो गुरूंकडे जाऊन ती द्वेषभावना व्यक्त करतो. त्या वेळी गुरु त्याला म्हणाले, त्या शिष्याला मी उत्तराधिकारीपदावरून काढून ते तुला दिले; कारण मला तुला यातून शिकवायचे होते, सेवा कोणती करतो, यापेक्षा गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून जो भावपूर्ण सेवा करतो, तोच गुरूंचे ख-याअर्थाने मन जिंकू शकतो. आजपासून तू आता स्वयंपाकघरात सेवेला असणार आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल.
यानंतर काही दिवसांनी हा दुसरा शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्रीगुरु शांत रहातात. त्यांना या शिष्याने या काळात घरी जाणे अपेक्षित नसते; परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती नसतांनाही घरी जातो. बर्याच काळानंतर तो परत येतो आणि गुरूंसमोर उभा राहतो. त्या वेळी गुरूंच्या डोळ्यांत पाणी येते आणि ते त्याच्याकडे केवळ पहातात; पण दुसर्याच क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला आज्ञा देतात याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत. याने येथून चालते व्हावे.
काही वेळाने उत्तराधिकारी शिष्य न रहावून गुरूंना विचारतो की, आपण त्या शिष्याला एवढा कठोर निर्णय दिला; पण आपले नेत्र का पाणावले होते ? त्यावर गुरु सांगतात, त्याची साधनेत पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती; पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला. ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.
मुलांनो, वरील कथेवरून आपल्याला लक्षात येर्इल की, गुरुआपल्या शिष्याची साधनेत प्रगती व्हावी, यासाठी सतत धडपडत असतात.