मित्रांनो, हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करून सार्या विश्वाला हिंदु संस्कृतीची ओळख करून देऊया !
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे; परंतु कुणीही कृतीमागील शास्त्र काय आहे ?, याचे प्रबोधन न केल्याने आपण हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करणे सोडून दिले आहे. काही गोष्टी काळ पालटला; म्हणून आपण आंधळेपणाने स्वीकारतो. मित्रांनो, कपड्यांविषयी पहा ना ? आपण फॅशन अन् सुधारणा यांच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा सात्त्विक पोषाख विसरलो आहोत. याचे परिणाम किती अनिष्ट होत आहेत, हे आपण पाहूया.
१. कोणतीही परिस्थिती आली, तरी आपल्या संस्कृतीचा पोषाख पालटण्याची आवश्यकता नसते !
काहीजण सांगतात, आताचे जीवन धावपळीचे झाले आहे, जीवनपद्धती पालटली आहे. त्यामुळे आपल्याला आपला पोषाख पालटावा लागतो. या सर्वांना सांगावेसे वाटते, झाशीची राणी किंवा शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी एवढा पराक्रम केला; पण त्यांना त्यांचा पोषाख कधी आड आला नाही. म्हणजेच कोणतीही परिस्थिती असली, तरी आपल्या संस्कृतीचा पोषाख पालटण्याची आवश्यकता नसते. आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि आपणच आपली संस्कृती प्राणापलीकडे जपली पाहिजे. आपण आपल्या हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच आपले रक्षण होईल, अशी श्रद्धा आपण ठेवायला हवी.
२. एखाद्या संस्कृतीची ओळख ही त्या व्यक्तीच्या पोषाखावरून होत असल्याने हिंदु संस्कृतीनुसार सात्त्विक पोषाख प्रतिदिन घालण्याचा निश्चय करूया !
मित्रांनो, वेषांतर म्हणजे धर्मांतर होय. हिंदूंची प्रत्येक कृती ही देवतांचे चैतन्य आणि शक्ती मिळवण्याचे माध्यम आहे. मित्रांनो आज पालटाच्या नावाखाली हे देवतांचे चैतन्य मिळवण्याचे माध्यमच आपण नष्ट केले, तर सर्वनाश अटळ आहे. आज एखाद्या संस्कृतीची ओळख ही त्या व्यक्तीच्या पोषाखावरून होते; म्हणून आपण प्रतिदिन आपल्या हिंदु संस्कृतीनुसार सात्त्विक पोषाख करण्याचा निश्चय करूया. मी किमान प्रत्येक सणाला माझ्या संस्कृतीनुसार सात्त्विक पोषाख करीन आणि अन्य हिंदू मुलांना तसे करायला सांगीन, असे ठरवूया.
३. सात्त्विक पोषाख कोणता ?
अ. पुरुषांनी करावयाचा सात्त्विक पोषाख : पुरुषांनी सदरा-पायजमा किंवा सदरा-धोतर असा पोषाख करावा.
आ. मुलींनी करावयाचा सात्त्विक पोषाख : मुलींनी परकर पोलके, पंजाबी पोषाख, तसेच स्त्रियांनी नऊवारी किंवा सहावारी साडी, असा पोषाख करावा.
४. सात्त्विक पोषाखाचे महत्त्व कुणीच सांगितले नसल्याने हिंदू पाश्चात्त्य पद्धतीच्या पोषाखाकडे आकृष्ट होणे
आधुनिकतेच्या पोकळ विचारांनी प्रभावित होऊन सात्त्विक पोषाखाकडे दुर्लक्ष करून पाश्चात्त्यांचा उथळ आणि असात्त्विक पोषाख आपण वापरू लागलो आहोत. मित्रांनो, आपल्या हिंदु संस्कृतीनुसार स्त्रिया आणि पुरुष यांनी सात्त्विक पोषाख परिधान केल्यावर त्यांना देवतांची शक्ती अन् चैतन्य मिळते, याचा व्यापक विचार केला आहे; पण दुर्दैवाने आपल्याला याचे महत्त्व कुणीच सांगितले नाही. त्यामुळे आपण सात्त्विक पोषाख सोडून पाश्चात्त्य पद्धतीच्या पोषाखाकडे आकृष्ट झालो आहेत.
५. आपण आपल्या महान हिंदु संस्कृतीच्या पोषाखापासून दूर जाण्याची कारणे
अ. इंग्रजी माध्यमांच्या शाळा : या शाळांमधून मुलांना शाळेत सदरा-पायजामा घालायचा नाही, मुलींनी परकर-पोलका घालू नये आणि कुंकू वा बांगडीही घालू नये, असे सांगितले जाते. या सात्त्विक पोषाखाविषयी मुलांमध्ये अपसमज आणि अनादर निर्माण केला जातो. आमची हिंदु मुले शर्ट, पँट आणि टाय यांसारखे पोषाख करू लागले आहेत. मित्रांनो, आपला पोषाख न वापरणेे म्हणजे आपल्या संस्कृतीपासून दूर जाणे, हे लक्षात घ्या !
आ. चित्रपट आणि मालिका : चित्रपट आणि मालिका यांमधून सतत विदेशी पोषाखातील व्यक्ती दाखवल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीच्या पोषाखाविषयी अनादर निर्माण होतो. मित्रांनो, अशा मालिकांच्या आहारी जाऊन आपल्या महान संस्कृतीचा विसर पडू देऊ नका.
इ. चित्र विचित्र रंग आणि चित्रे यांचे पोषाख घालणे : आपल्या संस्कृतीनुसार निळा, गुलाबी, पिवळा आणि पांढरा या रंगांतून वातावरणातील चैतन्य अधिक ग्रहण करता येते आणि चित्रविचित्र रंगाचे पोषाख घातल्याने मनाची चंचलता वाढते.
ई. देवतांची चित्रे असणारे कपडे वापरू नका ! : मित्रांनो, देवतांचे स्थान देवघरात आहे. तुम्ही कपड्यांवर देवतांची चित्रे असलेले कपडे वापरता, तेव्हा आपल्या देवतांचा अपमान होतो. यासाठी मुलांनो, बाल गणेश, छोटा भीम अशी चित्रे असणारे कपडे विकत घेऊ नका.
उ. स्त्री पुरुष-समानता या नावाखाली मुलींनी पुरुषांचेे पोषाख घालणे : देवानेच स्त्री आणि पुरुष अशा वेगळ्या प्रकृती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे मुलींनी पुरुषी कपडे घालून समानता आणणे, ही संस्कृती नव्हे, तर विकृती आहे. यासाठी बहिणींनो, समानतेच्या नावाखाली पुरुषांचा पोषाख घालू नका.
ऊ. स्वातंत्र्याच्या नावाखाली तोकडे कपडे परिधान करणे : मित्रांनो, कपडा हा अलंकार आहे. तो कसा असावा, कसा वापरावा, हे आपल्या संस्कृतीनुसार ठरलेले आहे. आज स्वातंत्र्याच्या नावाखाली मुली तोकडे कपडे घालतात. त्यामुळेे इतरांच्या मनात विकृत विचार येतात. प्रत्येक स्त्री-पुरुषानेे हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान केला असता त्यांना स्वतःला आनंद मिळेलच आणि इतरांनाही आनंद मिळेल.
६. काल्पनिक चित्रपट आणि मालिका यांतील आदर्श न ठेवता वास्तव जीवनातील इतिहासातील आदर्श ठेवूया !
मित्रांनो, आज मालिकांमधून जी पात्रे दाखवतात, त्यांचा वास्तव जीवनाशी काहीच संबंध नसतो. त्यापेक्षा झाशीची राणी, जिजाबाई, आहिल्याबाई होळकर आदी स्त्रियांचा आदर्श समोर ठेवूया.
विद्यार्थी मित्रांनो, हिंदु संस्कृतीनुसार आचरण करणे, ही आपल्या हिंदु संस्कृतीची ओळख आणि तिचा प्राण आहे. तिचे पालन करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. मुलांनो, आपण आता कपड्यांच्या माध्यमांतून आलेली इंग्रजांची मानसिक गुलामगिरी नष्ट करूया आणि आजपासून आपण हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख घालण्याचा निश्चय करूया.
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.