शिक्षणाचे ध्येय आणि उद्देश
विद्यार्जन करणे, हा शिक्षणाचा मुख्य हेतू होय. ‘सा विद्या या विमुक्तये ।’ आपली दुःखे नाहीशी करून आपणाला सतत आनंद कसा मिळेल, याचे ज्ञान ज्याने मिळते, तिलाच ‘विद्या’ असे म्हणावे.
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष असते. हुशार विद्यार्थी पुष्कळ अभ्यास करून आधुनिक वैद्य, अभियंता आणि मोठे अधिकारी झाले अन् त्यांनी पुष्कळ पैसे मिळवले, तरीही ते सुखी-समाधानी होतीलच, याची निश्चिती नसते.
शिक्षणाने पुढील गोष्टी साध्य झाल्या, तरच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल
१. ज्ञानसंवर्धन आणि बुद्धीमत्तेचा विकास
२. आपापल्या धंद्यातील नैपुण्याची शिकवण. ज्यायोगे त्याला भरपूर पैसा मिळाल्यास तो आपले आणि इतरांचे जीवन सुखी अन् संपन्न करू शकेल.
३. जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन
४. चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणे
५. आपला सांस्कृतिक वारसा सुधारणे आणि तो पुढच्या पिढीस देणे
६. आपल्या जीवनाचे ध्येय काय असावे आणि ते गाठण्यासाठी काय करावयास पाहिजे, याचे मार्गदर्शन करणे
७. विद्याथ्र्यांची आदर्श नागरिक म्हणून जडण-घडण करणे, दुर्दैवाने आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीत वरील गोष्टींचा अभाव प्रामुख्याने जाणवतो.
मुलांनो, आपणही शिक्षणाचा उद्देश ‘पैसा कमावण्यासाठी शिक्षण’, असा न ठेवता ‘धर्मसेवा अन् राष्ट्रसेवा करण्यासाठी शिक्षण’, असा ठेवायला हवा. म्हणजेच, अभ्यास करतांना हे ध्येय लक्षात राहून ‘साधना’ म्हणून तो अभ्यास होईल. ‘साधना’ म्हणून अभ्यास केल्यास आदर्श नागरिक बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुणही तुमच्यात निर्माण होतील.
मुलांनो, ज्ञान मिळवण्याचे महत्त्व लक्षात घेऊन अभ्यास केल्यावर अभ्यासामध्ये आपोआप गोडी निर्माण होऊ लागते. यामुळे आपोआपच परीक्षेची भीती किंवा ताणही नाहीसा होतो. ताण न घेता परीक्षा दिल्यामुळे साहजिकच उत्तम गुण आणि समाधानही मिळते. मुलांनो, आता परीक्षेचा ताण येऊ नये; म्हणून अभ्यासात गोडी निर्माण करणार ना ?