भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते 'बिना खङ्ग बिना ढाल नव्हे', तर सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या रक्तरंजीत बलिदानाने ! रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील झुंजार क्रांतीकारक हुतात्मा भाई ऊर्फ अण्णासाहेब ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे यांपैकीच एक थोर क्रांतीकारक ! अण्णासाहेब कोतवाल यांच्या क्रांतीकार्याची ओळख करून देणारा लेख देत आहोत.
विद्यार्थी दशेतील हुशारी आणि नेतृत्वगुण
रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील अण्णासाहेब कोतवाल यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ या दिवशी झाला. माथेरान येथील शाळेत जाणारे अण्णा अतिशय हुशार विद्यार्थी होते. एकदा शाळेतील शिक्षकांनी त्यांचे योग्य असलेले गणित चूक दिले. त्या वेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून दुस-यादिवशी शाळेत न येण्यास सांगितले आणि ते एकटेच वर्गात गेले. मास्तरांनी त्याचे कारण विचारताच त्यांनी त्यांचे गणित योग्य कसे आहे, ते त्यांना पटवून दिले. शिक्षक हसून म्हणाले, "विठ्ठल तू जिंकलास, मी हरलो !"
शिक्षण घेतांना राष्ट्रकार्याला वाहून घेण्यासाठी अचानक गायब झाले !
मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतांना तात्याराव सावरकारांची जहाल भाषणे, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, सखदेव यांचे बलिदान त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. प्रतिदिन घडणा-या स्वातंत्र्यचळवळीच्या घडामोडींनी त्यांचे मन पेटून उठे. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना एके दिवशी अचानक ते पुण्यातून गायब झाले. मुंबईत काँग्रेस हाऊसमध्ये जाऊन त्यांनी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवले.
विद्यार्थीदशेत गव्हर्नरचा खून करण्याचा कट
मुंबईचा गव्हर्नर विनाकारण निरपराध लोकांना कारागृहात टाकत होता. त्यांना ही मुस्कटदाबी सहन झाली नाही. त्यांनी एक रिव्हॉल्व्हर मिळवले आणि मित्रास घेऊन मुंबईला आले. दोन दिवस गव्हर्नरच्या बंगल्याबाहेर पाळत ठेवून बसले; परंतु योग्य संधी मिळाली नाही. त्यांच्या मित्राला गव्हर्नरच्या बंगल्यावर पाळत ठेवण्यास सांगितले; परंतु नंतर गव्हर्नर त्या बंगल्यातून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी दोन दिवसांची मेहनत वाया गेली म्हणून ते मित्रावर पुष्कळ चिडले. त्यांचा भयंकर क्रोध पाहून मित्राने घाबरून त्यांचे पिस्तुल ठाण्याच्या खाडीत टाकून पळ काढला. घरचे म्हणू लागले की, 'हे खूळ डोक्यातून काढून टाक'. अण्णांनी ठरवले, देशकार्यात आता माघार घ्यायची नाही; मृत्यू आला तरी चालेल !
गो-यासाहेबाला सलाम करायचा नाही, म्हणून नोकरी सोडली !
डॉ. तुकाराम यांनी त्यांच्या शिक्षणाचा भार उचलला होता. त्याच वेळी त्यांना महिना पन्नास रुपयांची नोकरी लावून दिली. त्या वेळी पन्नास रुपये म्हणजे एखाद्या मोठ्या अधिका-याचे वेतन होते. घरच्यांना वाटले ते सुधारले ! कचेरीत गोरा साहेब सकाळी येई. सर्वजण उठून त्याला सलाम करत. त्यांना ही गोष्ट खटकू लागली. एक दिवस साहेब आल्यावर आण्णा वर्तमानपत्र वाचत राहिले. साहेबाने जाब विचारल्यावर ते म्हणाले, "मला माझ्या कामाचे वेतन मिळते, सॅल्यूट ठोकण्याचे नाही." साहेबाला कोतवालांचे उद्धट वर्तन आवडले नाही. तो त्यांना म्हणाला, "गेटआऊट !" तेव्हा ते म्हणाले, "आम्हीच तुम्हाला हिंदुस्थानातून गेटआऊट करणार आहोत, ती वेळ आता दूर नाही !" अशा त-हेने त्यांनी दुस-यामहिन्यातच नोकरीला रामराम ठोकला.
वीज तोडली, तर इंग्रजाच्या मुसक्या आवळल्या जातील, हे अण्णांनी ओळखले !
ज्या विजेने रेल्वे, पुण्यातील दारूगोळ्याच्या निर्मितीचे कारखाने आणि मुंबईतील गिरण्या चालतात, ती वीज बंद पाडली, तर इंग्रजांच्या मुसक्या आवळल्या जाऊन दुस-यामहायुद्धासाठी लागणारी सामुग्री इंग्रजांना मिळणार नाही, हे अण्णांनी ओळखले. अण्णा भूमिगत झाले ! प्रचंड हालअपेष्टा सहन करत ते जंगलातून फिरत. समाजसेवेत जी माणसे जोडली, तीच पुढे त्यांच्या क्रांतीकार्यात उतरली आणि तो कोतवाल गट म्हणून प्रसिद्ध झाला.
विजेचे खांब पाडणारा कोतवाल गट कार्यरत !
अण्णांनी टाटा आस्थापनातील एका अभियंत्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून विजेचा खांब पाडायची माहिती घेतली. मुंबईच्या भूमिगत मुख्यालयाकडून आदेश आल्यावर २४ सप्टेंबर १९४२ च्या मध्यरात्री डोणे गावाजवळील विजेचा खांब (पायलन) कापायला कोतवाल गट निघाला. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात तीन तास हा गट खांब कापत राहिला… आणि अखेर खांब पाडण्यात या गटाला पहिले यश आले. विजेचा कडकडाट होऊन सहस्रो विजा एकदम चमकाव्या, तसा आवाज करीत खांब खाली कोसळला. परिसर पुष्कळ प्रकाशमय झाल्याने क्षणभर कुणाला काही समजलेच नाही. सर्वांनी ते दृश्य पाहून भारतमातेचा जयजयकार केला ! अशा तर्हे ने विजेचे खांब पाडण्याचे सत्र चालू झाले. त्यांना फक्त एकच माहीत होते की आपण कुठेही कमी पडायचे नाही. अण्णा म्हणायचे, 'देशभक्ती म्हणजे सुळावरची पोळी आहे. जो पचवील तो देशभक्त !'
कोतवालांना मृत अथवा जिवंत पकडण्याचा आदेश !
ठिकठिकाणचे विजेचे खांब पाडणे चालू होते. एव्हाना ब्रिटिशांनी अण्णांना जिवंत अथवा मृत पकडण्याचा विडा उचलला होता. या भूमिगत चळवळीमुळे कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य संगराचा अनभिषिक्त सम्राट म्हणून अण्णा कोतवालांचे नाव होऊ लागले.
अण्णांचे बलिदान !
पोलिसांच्या कामाला गती आली होती. याचा अंदाज अण्णांना होता. अल्प सहकार्यांसमवेत त्यांचा सिद्धगडच्या घाळीत मुक्काम होता. पहाटे शेकडो सशस्त्र पोलिसांनी आक्रमण केले. अण्णांना मांडीत गोळी लागली. पोलीस घळ चढून वर आले. अण्णा एका झाडाखाली बेशुद्ध पडले होते; पण पोलिसांना जवळ जाऊन पहाण्याचे धैर्य होईना. शेजारच्या झाडाच्या बुंध्यात ६०-७० गोळ्या घातल्याच्या खुणा होत्या. आजूबाजूला लागलेल्या वेगळ्याच. एका जखमीवर पोलिसांनी किती गोळ्या झाडाव्यात, याला सीमाच नव्हती ! थोड्या वेळाने तिथे इंग्रज अधिकारी हॉल आला. एकाने दरडावून विचारले 'तूच विठ्ठलराव कोतवाल का ?' त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले, 'होय ! मीच तो !' पोलीस त्यांना मारण्याचे टाळत होते; परंतु क्रूर हॉलने हातातील बंदुकीची नळी अण्णांच्या डोक्याला लावून चाप ओढला. एका शूर क्रांतीकाराचा इंग्रजांनी खून केला ! कोतवालांची प्राणज्योत मालवली. कोतवालांना हौतात्म्य प्राप्त झाले ! क्रांतीकारक अण्णा कोतवाल वकील आणि सहकारी हिराजी पाटील यांच्या नावाचा स्तंभ सिद्धगडच्या काताळावर निर्झराच्या संगतीने आजही शांतपणे उभा आहे !
संदर्भ : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील झुंझार क्रांतीकारक हुतात्मा भाई कोतवाल,
लेखक : शशिकांत चव्हाण.