बक-यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बक-यांच्या कळपात वाढू लागले. बक-यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बक-या बें बें करीत. तसेच तेही बें बें करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बक-यांच्या कळपावर एका वाघाने आक्रमण केले. कळपातील गवत खाणा-या वाघाला पाहून तो रानातील वाघ आश्चर्यचकित झाला. धावत जाऊन त्याने त्या गवत खाणा-या वाघाला पकडले. तो बे-बें करून ओरडू लागला. रानातल्या वाघाने त्याला ओरडत फरफटत तलावापाशी नेले. मग तो त्याला म्हणाला, ‘पहा, जरा पाण्यात आपले प्रतिबिंब पहा. पाण्यात तुझे तोंड दिसते आहे. नीट पहा, तू अगदी माझ्यासारखा दिसत आहेस आणि हे घे थोडेसे मांस खा’. असे म्हणून रानातल्या वाघाने त्याच्या तोंडात बळेबळे मांस कोंबले. आधी तो गवत्या वाघ मांस खायला सिद्ध होईना. तो एक सारखे बें बें करून ओरडत होता; पण थोडीशी रक्ताची चटक लागताच तो ते मांस आनंदाने खाऊ लागला. तेव्हा रानातला वाघ म्हणाला, ‘कळले ना आता ? अरे, जो मी आहे तोच तू आहेस. चल आता माझ्यासह वनात.’
तात्पर्य :गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)