दिवसभरात किती पाणी प्यावे ?
पाणी किती आणि कधी प्यावे याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. या मतभेदांमुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये पाणी कधी प्यावे याविषयी पुढील सूत्र दिलेले आहे.
ऋते शरन्निदाघाभ्यां पिबेत् स्वस्थोऽपि
चाल्पशः । – अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ५
अर्थ : शरद आणि ग्रीष्म ऋतू वगळता निरोगी माणसाने दिवसभरात थोडेच पाणी प्यावे.
तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान आणि भूक लागते. तहान लागते त्या वेळी एकाएकी घटाघट पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे, असे आयुर्वेद सांगतो.
संस्कृतमध्ये क म्हणजे पाणी आणि त्या कने, म्हणजे पाण्याने फलित होतो, तो कफ. अनावश्यक पाणी प्यायल्यामुळे शरिरात कफदोष वाढून पचनशक्ती मंद होते. काहीजणांना वैद्यांनी त्यांच्या रोगाला अनुसरून भरपूर पाणी पिण्यास सांगितलेले असते. ते पाणी रोग्याने एकाएकी न पिता दिवसभरातून थोडे थोडे प्यावे. ज्यांना पाव, ब्रेड यांसारखे मैद्याचे पदार्थ खाणे टाळता येत नाहीत, त्यांनी असे पदार्थ खातांना मध्ये मध्ये कोमट पाणी प्यावे, म्हणजे ते पदार्थ पचतात.
जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ?
याविषयी मार्गदर्शक सूत्र पुढीलप्रमाणे आहे.
समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपाः ।
– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ५
अर्थ : जेवतांना मधे मधे थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे पचन व्यवस्थित होते. जेवणानंतर (भरपूर) पाणी प्यायल्यास व्यक्ती स्थूल होते, म्हणजे अनावश्यक चरबी वाढते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास भूक मंदावते, जेवण न्यून जाते आणि व्यक्ती कृश होते; पण असे कृश होणे आरोग्याला अपायकारक असते.
जेवतांना मधे मधे थोडे थोडे पाणी पिणेच योग्य आहे. जेवणात द्रव पदार्थ भरपूर असल्यास वेगळे पाणी पिण्याची आवश्यकता नसते.
– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात