१२. साधिकेचा उद्धार करण्या श्रीकृष्ण बालरूपामध्ये येणे
१२ अ. चित्र काढण्यामागील पार्श्वभूमी : ‘माझे यजमान चाकरीतून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या कार्यालयात झालेल्या निरोप समारंभामध्ये त्यांना कार्यालयाच्या वतीने लोणी चोरत असलेल्या बाळकृष्णाचे चित्र भेट देण्यात आले. हे चित्र पहातांना ‘बालरूपातील भगवान श्रीकृष्ण मला शोेधत माझ्याकडे आला आहे’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा मिळाली.
१२ आ. साधिकेने रेखाटलेल्या चित्राचा भावार्थ : मी बालकभावाच्या स्थितीत अडकलेली आहे आणि या स्थितीच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही, हे श्रीकृष्णाने जाणल्यामुळे, तोच बालरूपामध्ये येऊन मला पुढे घेऊन जात आहे.
१. श्रीकृष्णाने ज्ञानाचे लोणी भरवणे : लोणी भरवतांना ‘श्रीकृष्ण मला सगुणातून निर्गुणात जाण्याचे, बालकभावातून गोपीभावात जाण्याचे आणि शेवटी त्याच्याशी एकरूप होण्याचे ज्ञान देत आहे’, असे जाणवले.
२. श्रीकृष्णाने गोपी भक्तीची बासरी देणे : भगवान श्रीकृष्णाने गोकुळ सोडून जातांना त्याची बासरी राधेला दिली होती. त्यामुळे बासरी गोपीभावाचा उच्च स्तर असल्याचे दर्शवते.
३. श्रीकृष्णाने वैराग्याचे मोरपीस डोक्यावर ठेवणे : साक्षात् भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात विराजमान असलेल्या मोरपिसाला त्याच्या मुकुटातून काढल्यानंतरही मोरपिसाला काहीच वाटत नाही. मोरपिसामध्ये अहं अल्प असल्याचेच हे द्योतक आहे. मोरपिसाकडून ‘कधी कधी सात्त्विक आसक्तीसुद्धा आपल्याला ईश्वरापासून दूर नेते’, हे मला शिकायला मिळाले. भगवान श्रीकृष्ण स्वतः बालकरूपामध्ये येऊनही तो पितृवात्सल्याने माझ्याकडे पहात असल्याचे मला जाणवले.
प.पू. डॉक्टरांची(टीप) अपार कृपा आणि वात्सल्य यांमुळे ते मला विविध मार्गांनी शिकवत आहेत, याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. भगवंता, तुझी लहानातील लहान शिकवण ग्रहण करता येण्यासाठी मला सातत्याने सतर्क रहाता येऊ दे.
(टीप : प.पू. डाॅक्टर म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प. पू. डाॅ. जयंत आठवले )
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (७.४.२०१३)
१३. श्रीकृष्ण संसाराच्या भवसागरातून सर्वांना पैलतिरावर नेत असणे
१३ अ. चित्राचे विवरण : १२.११.२०१२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. नेहा भट यांची श्रीकृष्ण नावाडी होऊन आपत्काळाच्या काळ्या भयानक पाण्यातून साधकांना पैलतिरी नेत असल्याची अनुभूती वाचली. त्या अनुभूतीतून प्रेरणा मिळून मला ‘बालकन्हैया…’ हे मूळ तामिळ लोकगीत आठवले आणि त्यासंबंधीचे चित्रही माझ्याकडून काढले गेले. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्या साध्या लोकभाषेतील गीताच्या मतितार्थाची खोली मला त्या वेळी जाणवली. या गीतामध्ये श्रीकृष्ण नावाडी असून तो संसाराच्या या भवसागरातून आम्हाला पार करत असल्याचे वर्णन आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१३.११.२०१२)