भगवान श्रीकृष्णाची शिकवण देणारी कृष्णमय चित्रे (भाग १)

१. श्रीकृष्णाने पित्याप्रमाणे ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्‍लोकापासून दिनचर्येतील आचार शिकवणे


1398940136_balak_bhav_2_C1_b

१ अ. चित्राचे विवरण

२७.१०.२०१२ या दिवशी मी ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’ या ग्रंथाचे मराठीतून तामिळमध्ये भाषांतर करण्याची सेवा करत होते. त्या वेळी ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्‍लोकाचा भावार्थ समजून घेत असतांना माझी भावजागृती झाली आणि मी हे चित्र काढले. मी भाषांतराची सेवा करत असल्यामुळे प.पू. डॉक्टरांनी(टीप) मला ही चित्ररूपी भेट दिल्याचे जाणवले.
(टीप : प.पू. डाॅक्टर म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प. पू. डाॅ. जयंत आठवले )

१ आ. चित्राचा भावार्थ

१ आ १. श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादामुळे चित्राचा भावार्थ अंतर्मनात बिंबणे : श्रीकृष्ण चांगल्या पित्याप्रमाणे मला ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्‍लोकापासून दिनचर्येतील एकेक आचार शिकवत असून त्याच्या कृपाशीर्वादामुळे या श्‍लोकासमवेत त्याचा भावार्थही माझ्या अंतर्मनात बिंबवला गेला आहे.

१ आ २. ईश्‍वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे : ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे. त्यामुळे अज्ञानी जिवांना तो कोठेच सापडणार नाही. हिरण्यकश्यपूने ईश्‍वराला शोधण्याचे पुष्कळ अयशस्वी प्रयत्न केले; मात्र भक्त प्रल्हादाला तो चराचरात दिसत होता. ‘रामसेतू बांधणारा प्रभु रामचंद्र कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाला ?’, असे कलियुगातील आधुनिक हिरण्यकश्यपू विचारतात; परंतु तळमळ असलेल्या भक्तांसाठी तो त्यांच्या हातांमध्ये बद्ध आहे. ‘या सृष्टीचा निर्माता आपल्या हातात बद्ध असून आपल्याला हवे तेव्हा तो दर्शन देतो’, या अद्भुत कल्पनेनेच अनंत कोटी कृपेची जाणीव होते. आपल्या भक्तांसाठी तो सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होतो.

१ आ ३. हातांच्या ओंजळीमध्ये दर्शन घेतल्यावर भगवंताने धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देणे : प्रतिदिन सकाळी आपल्या हातांच्या ओंजळीमध्ये दर्शन देऊन तो आमचा वेळ वाचवतो आणि झोकून देऊन धर्मकार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करून प्रोत्साहितही करतो.

१ आ ४. शरणागतीचे महत्त्व

अ. कर्तेपणा भगवंताच्या चरणी अर्पण केल्यावर त्याने कल्पनेच्या पलीकडे कार्यक्षमता वाढवून सर्व कार्य करवून घेणे : एखाद्या शास्त्राच्या तात्त्विक भागाला केवळ २ टक्के महत्त्व असते, तर प्रायोगिक भागाला ९८ टक्के महत्त्व असते. त्याचप्रमाणे इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचे रूपांतर क्रियाशक्तीमध्ये झाल्यासच त्यांना पूर्णत्व येते; कारण क्रियाशक्ती कृती दर्शवते. आपल्या सर्व कृती आणि उपक्रम यांमध्ये हातांचा मोठा सहभाग असतो. आपण शरणागतभावाने जेव्हा कर्तेपणा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा तो आपली कार्यक्षमता कल्पनेच्या पलीकडे वाढवतो आणि आपल्याकडून कार्य करवून घेतो.

आ. शरणागतीच्या या प्रक्रियेत जेव्हा आपण स्वतःचे हात भगवंताच्या चरणी समर्पित करतो (शरण जातो), तेव्हा आपल्यातील अहं उणावतो.

इ. शरणागतभावाने केलेले प्रत्येक कर्म हे अकर्म कर्म बनते.

१ आ ५. हातांची ओंजळ आणि कमळ : आपण भावपूर्णरित्या हातांची ओंजळ केल्यावर त्याला कमळाप्रमाणे आकार प्राप्त होऊन आपली बोटे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे होतात आणि हे कमळ भगवंताच्या चरणी अर्पण केले जाते.

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई

२. श्रीकृष्णाने श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची, हे शिकवणे


1398940342_balak_bhav_2_C2_b

२ अ. चित्राचे विवरण : ‘गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची, हे मला श्रीकृष्ण शिकवत आहे. या वेळी तो पुजारी बनला असून त्याच्या मार्गदर्शनानुसार मी श्री गणेशाची पूजा करत आहे. प्रत्यक्ष श्री गणेश तेथे उपस्थित असून तो नैवेद्य ग्रहण करत आहे.

बालकभावाचे हे चित्र मी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात बसून काढले.

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (९.९.२०१२, सकाळी ८.००)

२ आ. चित्ररेखाटनाच्या स्थळाचे महत्त्व

१. इतर ठिकाणी काढलेल्या चित्रांपेक्षा ध्यानमंदिरात बसून साधिकेने रेखाटलेल्या चित्रातील श्रीकृष्णाच्या चेहेर्‍यातून त्याचे दैवी सौंदर्य प्रकट होणे, हे चैतन्यमय ठिकाणी बसून चित्र रेखाटले असता प्रतिभा आणखीनच खुलते, याचे उत्तम उदाहरण असणे : आतापर्यंत काढलेल्या चित्रांपैकी या चित्रातील श्रीकृष्ण खूपच सुंदर काढला असून ‘श्रीकृष्णाचे सौंदर्य दैवी तेजाने नटले आहे’, असे वाटते. या चित्रातील श्रीकृष्णाच्या मुकुटाची कलाकृतीही (नक्षीही) अधिक सात्त्विक आहे. हे चित्र आश्रमातील ध्यानमंदिरात बसून काढलेले असल्याने येथील चैतन्यमय वातावरणात श्रीकृष्णाच्या मुखावरील (चेेहेर्‍यावरील) देवत्व विशेषत्वाने प्रकट झाले आहे. यावरून चैतन्यमय स्थळाचे महत्त्व लक्षात येते.

२. चित्रातील बालकभावातील साधिकेच्या परकरावर रेखाटलेल्या फुलांच्या सार्वत्रिक कलाकृतीतून साधिकेला रामनाथी आश्रमात आल्यामुळे झालेला आनंद प्रकट होणे : या चित्रातील बालकभावातील साधिकेचा आनंद वाढल्याचे दिसत आहे. आतापर्यंत काढलेल्या चित्रांत बालकभावातील साधिकेच्या परकराची केवळ किनार कलाकृतीयुक्त (नक्षीयुक्त) दाखवली आहे; मात्र परकराच्या पार्श्‍वभूमीवर फुलांची कलाकृती काढलेली दिसत नाही. या चित्रात बालसाधिकेने घातलेल्या परकरावर आनंददायी फुलांच्या कलाकृतीची उधळणच केली आहे. श्रीकृष्णाच्या दैवी सौंदर्यासमवेतच बालकभावातील साधिकेचा परकरही अत्यंत सुंदर आहे, म्हणजेच तोही आनंद प्रकट करणारा आहे. आश्रमात आल्यानंतरचा आनंद साधिकेने तिने चित्रात घातलेल्या परकरातूनही प्रकट केला आहे.

३. साधकाची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसा चित्रातील भावाचा स्तर चैतन्याकडे झुकतो, हे स्पष्ट करणारे चित्र ! : जसजशी साधिकेची चित्रातील भावाच्या स्तरावरील समरसता वाढत चालली आहे, तसा पुढच्या पुढच्या चित्रांमध्ये अधिकाधिक सत्त्वगुण येत आहे, असे सर्व चित्रे पहातांना लक्षात येते. पूर्वीच्या चित्रांमध्ये भाव जाणवतो, तर आश्रमातील ध्यानमंदिरात बसून काढलेल्या चित्रात मात्र भावासह चैतन्यही जाणवते. साधकाची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसा चित्रातील भावाचा स्तर चैतन्याकडे झुकतो, हेच यातून स्पष्ट होते.

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २)
(धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment