समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !
गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना हेकळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, ‘‘अंबाजी, कल्याण आहे ना ?’’
‘‘हो, कल्याण आहे स्वामी !’’ विहिरीतून उत्तर आले.
‘‘चल ये तर मग वरती.’’ समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला ‘कल्याण’ या नावाने हाक मारू लागले.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ,दोष घालवा आणि गुण जोपासा (प्रकरण २ : गुण का आणि कसे जोपासावेत ?)