जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात
अ.सूर्यास्तानंतर ३ घंट्यांच्या आत जेवावे. सूर्योदय आणि सूर्यास्त, तसेच दुपारी १२ वाजता आणि रात्री १२ वाजता जेवू नये.
आ.शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या आत रात्रीचे जेवण घ्यावे: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडकडीत ऊन असते. या काळात भोजन केल्यास तेव्हा जठराग्नी प्रदीप्त झाल्याने शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते.
यासाठी शक्यतो दुपारी १२ वाजेपर्यंत सकाळचे आणि रात्री ९ च्या आत रात्रीचे जेवण घ्यावे.
इ. सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणाचे महत्त्व: सकाळचे जेवण जीवनासाठी (दिनचर्येसाठी) आवश्यक असणार्या क्रियालहरी पुरवते (कार्य करण्यासाठी शक्ती पुरवते.) आणि रात्रीचे जेवण रात्रीच्या काळात वाढत असलेल्या रज-तमाशी लढण्यासाठी ऊर्जालहरी पुरवते. तसेच जेवणामुळे प्राणावर आवरण येणे टळते; कारण अन्न प्राणाला चैतन्य पुरवण्याचे कार्य करते.
(प्राणाला चेतना नसेल, तर त्याचे कार्य थांबते. प्राणाचे कार्य थांबणे म्हणजे प्राणावर आवरण येणे, या अर्थी येथे ‘आवरण’ हा शब्द वापरला आहे.)
वेळेवर न जेवल्यास होणारे तोटे
शरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे. शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य हे एकमेकांना पूरकही असतात. वेळेवर न जेवल्यास शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य बिघडू शकते, तसेच आध्यात्मिक स्वास्थ्यही बिघडते.
अ. शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील तोटे
१. वेळेत न जेवल्यास शरीरस्वास्थ्य बिघडते.
२. जोपर्यंत आपण जेवत नाही किंवा पाणी पीत नाही, तोपर्यंत आपल्या मनात मला जेवायचे आहे, पाणी प्यायचे आहे, असे विचार सातत्याने उमटत राहिल्याने मनाची शक्ती अनाठायी व्यय (खर्च) होते.
(वरील तोटे मलमूत्र-विसर्जन वेळीच न केल्यानेही होतात.)’
३. जिवाचा अन्नमयकोष आणि प्राणमयकोष यांना शक्ती पुरवण्याचे कार्य अन्न करते. प्राणमयकोषाचा मनोमयकोषावर परिणाम होतो. अन्नाचे सेवन योग्य वेळेत केले नाही, तर देहाला अन्नशक्तीचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे पेशींतील ऊर्जा घटून प्राणमयकोष दुर्बळ होत जातो. स्थूलदेहाचाही अशक्तपणा वाढून मनाचे कार्यही व्यवस्थित होत नाही. या सर्वांचा परिणाम शरिराच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे वेळेत अन्नग्रहण करणे शारीरिकदृष्ट्या आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात