१. घरी बनवलेले जेवण मुलांसह एकत्र जेवणे,
आता जुन्या पद्धतीचे मानले जाणे
अनेक घरांमध्ये पूर्वी एकत्र बसून रात्रीचे जेवण घेतले जायचे. आता मात्र कामाच्या वेळा, धावपळ, स्पर्धेच्या युगात रात्री एकत्र जेवणे तसे अवघडच आहे. रात्रीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणे, हे तुमच्या कौटुंबिक सौख्यासाठी चांगले आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे.
घरी बनवलेले जेवण मुलांसह एकत्र जेवणे, आता जुन्या पद्धतीचे (ओल्ड फॅशन्ड) मानले जाऊ लागले आहे. त्याला कारण मुलांच्या शिकवणीच्या वर्गाच्या (क्लासच्या), नोकरीवरून घरी परतण्याच्या वेळा यांना काही घरबंधच राहिलेला नाही. अनेकदा व्यवसाय, कार्यालयीन बैठका, कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणे आणि इतर कार्यक्रम यांमुळे घरातल्यांसह जेवण करण्याचे प्रसंग आता अल्प होऊ लागले आहेत.
२. कुटुंबासह जेवण घेतल्यास आपल्या कौटुंबिक संबंधात सुधारणा होणे
आपण आपल्या कुटुंबासह जेवलात, तर कौटुंबिक संबंधात सुधारणा होते. अनेकदा तर मुले उघडपणे सांगत नसली, तरी त्यांना अशा वेळी आपण आपल्या पालकांच्या फार जवळ असल्याचे वाटते. त्यामुळे जेवणही हसत-खेळत होते. अनेकदा मुलांचे वडील आणि आई यांपैकी एखाद्याशी अधिक जवळचे नाते असते; पण अख्ख्या कुटुंबाविषयी जिव्हाळा वाटण्यासाठी असे जेवण घेणे फारच लाभदायक ठरते.
अनेक पालक जेवणाच्या वेळी मुले असली की, अधिक मोकळेपणाने वागतात, असा अनुभव या अभ्यासाअंती नोंदवण्यात आला आहे. अनेकदा आपल्या घरातल्या रीतीरिवाज, परंपरा यांची माहिती मुलांना देण्यासाठी हे सहभोजन उत्तम ठरते.
३. काही 'एनजीओ'ने (अशासकीय संस्थांनी) पालक आणि मुले यांमधला सुसंवाद कायम रहावा किंवा वाढीला लागावा, यासाठी अशा सहभोजनाची आवश्यकता व्यक्त केली.
४. नुसते जेवण ही गोष्ट नाही, तर जेवतांना कोणकोण समवेत होते, कोणी जेवण केले, कोणी वाढले आणि कोणी गप्पा मारल्या, या सगळ्याच गोष्टींविषयी मुले अधिक संवेदनशील होतात. एखाद्या कुटुंबात तणाव असतात. त्यावरही मात करण्यासाठी असे एकत्र जेवणे खरेच लाभदायक ठरते, असेही निरीक्षण नोंदवले गेले.
संदर्भ :महाराष्ट्र टाईम्स, २९.१.२०११