हकिकतराय या बालविराने धर्मासाठी
बलीदान करून ‘स्वधर्मे निधनं श्रेेयः ।’ या वचनाचे पालन करणे
१. हकिकतरायला एके दिवशी काही यवनमुलांनी शिव्या देणे;पण तो गप्प राहिल्यामुळे ती अधिकच चेकाळणे
हिंदुस्थानावर शहाजहानची सत्ता होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. सियालकोटच्या एका शाळेत हकिकतराय नावाचा तेरा-चौदा वर्षांचा मुलगा शिकत होता. एके दिवशी काही यवन मुलांनी त्याला शिव्या दिल्या. इतक्या मुलांशी दोन हात करणे शक्य नाही’, हे लक्षात घेऊन तो गप्प बसला. तेव्हा ती मुले अधिकच चेकाळली.
२. उन्मत्त मुले हिंदूंच्या देवतांना शिव्या देऊ लागल्यावर
हकिकतरायने त्यांना प्रत्युत्तर केल्यावर ती अधिकच संतापणे
‘हकिकतरायला आपला राग यावा आणि त्याने हात उचलताच त्याला चांगले बदडून काढावे’, असा विचार करून ती उन्मत्त मुले हिंदूंच्या देवतांना शिव्या देऊ लागली. आपली देवता आणि धर्म यांचा अपमान त्या वीर बालकाला जरासुद्धा सहन झाला नाही. तो चवताळून म्हणाल, “आता एकही अपशब्द बोलाल तर खबरदार ! मी एक वेळ माझा अपमान सहन करीन; पण माझा धर्म आणि माझ्या प्रिय देवतांविषयी अवाक्षर जरी काढलेत, तर ते मी सहन करणार नाही. देवाने मलाही तोंड दिले आहे. मीही तुमच्याविषयी वाटेल ते बोलू शकतो.” तेव्हा ती उद्धट मुले अधिकच संतापली आणि म्हणाली, “अरे, आमच्या विरुद्ध बोलून तर दाखव. मग आम्ही तुझा कसा समाचार घेतो ते तू पहाशीलच !” तेव्हा हकिकतरायनेही त्यांना काही कटू वाक्ये ऐकवली.
३. ‘हा इस्लामचा विरोधक आहे’, असा कांगावा करून त्या कोवळ्या मुलाला कारागृहात डांबणे
बस्स ! त्या यवन मुलांनी त्याचेच भांडवल केले आणि मुल्ला-मौलवींकडे हकिकतरायची तक्रार केली. त्यांनी सांगितलेला वृत्तांत ऐकून मुल्ला-मौलवींचेही पित्त खवळले. ‘हा इस्लामचा विरोधक आहे’, असा कांगावा करून त्यांनी त्या कोवळ्या मुलाला कारागृहात डांबले.
४. मुघल शासकाकडून हकिकतरायच्या नावे काढलेले फर्मान ऐकून त्याच्या माता-पित्यांच्या पायाखालची वाळूच सरकणेआणि त्यांनी त्याला मुसलमान धर्म स्वीकारण्यास सांगणे; पण त्याने नकार देणे
काही दिवसांनी मुघल शासकाकडून हकिकतरायच्या नावे एक फर्मान जारी करण्यात आले. त्यात लिहिले होते, “तुम्ही मुसलमान बनाल, तरच तुम्हाला क्षमा करण्यात येईल, अन्यथा मरणाला तयार रहा.” ते ऐकून हकिकतरायच्या माता-पित्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी त्याची भेट घेतली आणि म्हणाले, “बाळा, तू मुसलमान हो. तू जिवंत राहिलास, तरच जगण्याला काही अर्थ उरेल, अन्यथा ..” तेव्हा हकिकतराय म्हणाला, “मी मुसलमान झालो, तरी आज ना उद्या मरणारच आहे. मग आपल्या धर्मात राहूनच मरण पत्करले तर काय वाईट ? माझे काय व्हायचे असेल, ते होवो; पण मी जिवंत असतांना दुसर्याचा धर्म स्वीकारणार नाही.” हकिकतरायच्या या निर्धारापुढे त्याचे आई-वडील हतबल झाले. कारागृहातील मुसलमान अधिकार्यानीही त्याला हालहाल करून मारण्याच्या धमक्या दिल्या; पण त्याच्या दृढ निश्चयापुढे त्यांचे काही चालले नाही.
५. क्रूर काझीने जल्लादाला तलवार चालवण्याचा
आदेश दिला, तेव्हा त्या निरागस, निर्दोष बालकास पाहून त्याचीही हिंमत खचणे
शेवटी मुघल शासकांनी त्याला अनेक प्रलोभने दाखवून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. तेव्हा त्याच्या शिरच्छेदाचा आदेश देण्यात आला. मृत्यूसमयी जल्लादाच्या (मृत्यूदंड देणार्याच्या)हातातील तळपती तलवार पाहून हकिकत डगमगला नाही. क्रूर काझीने जल्लादाला तलवार चालवण्याचा आदेश दिला, तेव्हा त्या निरागस, निर्दोष बालकास पाहून त्याचीही हिंमत खचली
६. हकिकतरायने तलवार जल्लादाच्या हाती देऊन
देवाचे चिंतन करूलागणेआणि त्याच्या वाराने त्याचे मस्तक धडावेगळे होणे
त्याच्या थरथरत्या हातातून तलवार गळून पडली. तेव्हा संतापलेल्या काझीने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्या प्रसंगी हकिकतरायने ती तलवार स्वतः त्या जल्लादाच्या हाती दिली आणि देवाचे चिंतन करू लागला. दुसर्याच क्षणी जल्लादाच्या वाराने हकिकतरायचे मस्तक धडावेगळे झाले.
७. अशा प्रकारे एका बालविराने धर्मासाठी बलिदान करून ‘स्वधर्मे निधनं श्रेेयः ।’ हे वचन पाळले. या बलिदानाने हकिकतरायचे नाव इतिहासात अजरामर झाले.
संदर्भ : जय हनुमान, १५.५.२०१०