पतीसाठी (क्रांतीकारक भाई बालमुकुंद यांच्यासाठी) आत्मोसर्ग करून त्याच्याशी कायमची एकरूप होणारी रामरखी
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक युवकांनी प्राणांची आहुती दिली. राष्ट्रासाठी काहीही करण्यासाठी सिद्ध असलेल्या त्या पिढीचा आदर्श आजच्या पिढीसमोर ठेवण्यासाठी युवा आणि बालके यांच्यासाठी विशेषत्वाने देत आहोत.
१. भाई बालमुकुंद क्रांतीकारक झाले !
‘भाई मतिदासांचे वंशज भाई बालमुकुंद यांचा जन्म पंजाब प्रांतातील चकवाल या गावी ख्रिस्ताब्द १८८५ मध्ये झाला. इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने क्रूरकर्मा औरंगजेबाने करवतीने उभे चिरून गुरु तेगबहादुरांचे सहकारी भाई मतिदासांची हत्या केली होती. बालमुकुंद पदवीधर झाल्यानंतर भाई परमानंद या स्वतःच्या चुलत भावाच्या संपर्कात आले आणि कट्टर क्रांतीकारक बनले.
२. भारतमातेसाठी बलिदान देण्याचे सौभाग्य स्वतःला प्राप्त झाल्याचे उद्गार काढणारे क्रांतीकारक भाई बालमुकुंद !
बाँबस्फोटातील सहभागासाठी होणारी अटक भाई बालमुकुंद टाळण्यासाठी जोधपूरला संस्थानिकांच्या युवराजांचे शिक्षक झाले. शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडले आणि दिल्लीला आणले. खटला चालू होता. फाशीची शिक्षा ऐकल्यावर त्यांचे डोळे विलक्षण तेजाने चमकले आणि सहज उद्गार निघाले, ‘माझ्या पूर्वजांपैकी भाई मतिदासांनी देश आणि धर्म यांसाठी दिल्लीत बलीदान दिले. याच दिल्लीत परमप्रिय भारतमातेसाठी बलीदान देण्याचे सौभाग्य मलाही प्राप्त होत आहे.’
३. नवरा पंजाबच्या क्रांतीकारकांचा नेता असल्याचे कळल्यावर ऊर अभिमानाने भरून येणे
बालमुकुंदांच्या धर्मपत्नी रामरखीने केलेल्या विलक्षण आत्मबलीदानामुळे तीसुद्धा अनुसूया, सीता, सावित्री या प्राचीन भारतीय पतीव्रतांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसली. आर्य समाजाच्या संस्कृतीत वाढलेल्या रामरखीचा वयाच्या १७ व्या वर्षीच आर्यवीर बालमुकुंदासमवेत विवाह झाला. ‘आपला नवरा पंजाबच्या क्रांतीकारकांचा नेता आहे’, हे कळल्यावर तिचा ऊर अभिमानाने भरून आला.
४. क्रांतीकारक भाई बालमुकुंदाने वीरपत्नीप्रमाणे स्वतःच्या कर्तव्यांचे पालन करण्यास पत्नीला सांगणे
अल्प वैवाहिक सहजीवनानंतर पतीला अटक झाली. बालमुकुंदांना फाशीची शिक्षा घोषित झाल्यावर रामरखी त्यांना भेटायला कारागृहात गेल्या. त्या वेळी बालमुकुंदांनी तिला उपदेश केला, तू एक आर्य कन्या आहेस. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी तुझा नवरा बलीदान देत आहे, याचा तुला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. मला मृत्यू आला, तरी आत्मा अमर असतो. त्यामुळे तो तुझ्यापाशीच राहील. वीरपत्नीप्रमाणे स्वतःच्या कर्तव्यांचे पालन कर.
५. पतीचा आदेश शिरोधार्य मानून त्याप्रमाणेच आचरण करू लागणे आणि त्यातून अपूर्व आनंदाची अनुभूती येणे
परत येतांना पतीची कारागृहातील दिनचर्या रामरखीने जाणून घेतली. रामरखीने आपल्या पतीचा आदेश अक्षरशः शिरोधार्य मानला. पत्नीधर्म म्हणून रामरखीने आहारात जाडीभरडी पोळी खायला प्रारंभ केला. ती लहान अंधार्या खोलीत केवळ कांबळ्यावर झोपू लागली. असे करतांना तिला अपूर्व आनंदाची अनुभूती येत असे. मीरेला जशी श्रीकृष्ण भेटीची ओढ लागली होती, त्याप्रमाणे रामरखीचे झाले होते. घंटेचा नाद जसा कानात गुंजत राहतो, त्याप्रमाणे पतीचे कारागृहात ऐकलेले बोल तिच्या कानात सतत गुंजत असत.
६. रामरखीचा आत्मा पतीच्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी आसुसणे आणि आत्मोसर्ग करून पतीशी कायमची एकरूप होणे
पतीला फाशी दिल्याची बातमी तिला समजल्यावर तिचा जीव तळमळला. समुद्राच्या भेटीसाठी नदी जशी ओढ घेते, त्याप्रमाणे तिचा आत्मा पतीच्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी आसुसला होता. रामरखीने अन्नजलाचा त्याग आरंभ केला. १८ दिवसांनी तिची तपश्चर्या फळाला आली आणि आत्मोसर्ग करून ती पतीशी कायमची एकरूप झाली.
संदर्भ : पाक्षिक आर्यनीती, १० फेब्रुवारी २०११