एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !
मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदी रहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती’ ठेवा.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ,दोष घालवा आणि गुण जोपासा (प्रकरण २ : गुण का आणि कसे जोपासावेत ?)