हिंदु युवांनो, फ्रेंडशिप डे सारख्या पाश्चात्त्य विकृतीला बळी पडू नका,
तर धर्मशिक्षण घेऊन हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करा !
ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशीप डे ३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. मैत्री दिनाच्या नावाखाली या दिवशी मित्रमंडळींना मेजवानी देणे, मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात. शाळा-महाविद्यालये यांतून त्याचे प्रमाण लक्षणीय असते. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? एकमेकांना संकटकाळी साहाय्य करणे, मित्र किंवा मैत्रिण यांचे पाऊल चुकीच्या दिशेने जात असतांना त्यांना साहाय्य करणे, याला खरी मैत्री म्हणतात. एकमेकांना अडचणीच्या वेळी साहाय्य केल्याची अनेक उदाहरणे हिंदूंच्या प्राचीन इतिहासात पहायला मिळतात. श्रीकृष्ण-सुदामा हे त्यातीलच एक ! आताचे हिंदू मात्र पाश्चात्त्यांच्या आहारी जाऊन असे मैत्रीचे प्रदर्शन करण्यातच मोठेपणा मानतात. खरे तर राष्ट्र संकटात असतांना असे फाजील दिवस साजरे करण्यापेक्षा सर्व मित्रमंडळींचे राष्ट्र, धर्म आणि हिंदु संस्कृती यांवरील आघातांच्या संदर्भात प्रबोधन करून त्यांना राष्ट्रकार्यार्थ कृतीप्रवण करणे, हेच खरे राष्ट्र-धर्माप्रतीचे खरे सख्य आहे !
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात