१. गणपतीचा जास्तीतजास्त जप करा !
गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात.
२. प्रतिदिन अकरा वेळा संकटनाशन स्तोत्र म्हणा !
या कालावधीत गणेशतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने आपल्याला याचा लाभ होऊन अभ्यासातील सर्व अडथळे दूर होतात.
३. अथर्वशीर्षाचे पठण करा !
मुलांनो, आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे आपण पठण करूया.
४. जास्तीतजास्त प्रार्थना करा !
आपण ज्या भाषेत बोलतो, ती भाषा म्हणजे नादभाषा. इतर देवतांपेक्षा गणपतीला आपली भाषा कळते; म्हणून आपण जास्तीतजास्त प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करूया.
५. मित्रांनो, गणेशोत्सवातील पुढील गैरप्रकार बंद करा !
५ अ. किंचाळत आणि बेसूर आरत्या म्हणणे : अशा प्रकारे आरत्या म्हटल्याने गणेशतत्त्वाचा लाभ होत नाही, तर तेथील शक्ती नष्ट होते. आर्ततेने म्हणतात ती आरती. तेव्हा हा गैरप्रकार बंद करून कृपा संपादन करूया.
५ आ. फटाके वाजवणे : फटाके वाजवल्याने देवाचे चैतन्य नष्ट होते आणि वातावरणातील प्रदूषण वाढते. तेव्हा आपण हा गैरप्रकार बंद करायला हवा, तरच गणपतीची कृपा होईल.
५ इ. चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करणे : गणेशोत्सवात नृत्याचा कार्यक्रम ठेवायचा असल्यास तो शास्त्रीय नृत्याचा असावा. देवतेसमोर चित्रपटांच्या गाण्यांवर नाचणे अयोग्य आहे. अशा स्पर्धेमध्ये भाग न घेणे, ही उपासनाच आहे. मुलांनो, यावर बहिष्कार घाला.
५ ई. गणपतीचा मुखवटा घालून विचित्र नाचणे : गणपतीचा मुखवटा घालून नाचणे, हे आपल्या देवतेचे विडंबन आहे. देवता म्हणजे खेळणे नव्हे.
५ उ. गणपतीसमोर पत्ते खेळणे : आजकाल काही मुले गणपतीसमोर जागरण म्हणून पत्ते खेळतात. हा प्रकार आपण थांबवायला हवा; कारण जागरण भजन म्हणून करायला हवे.
५ ऊ. रिमिक्सवर आरत्या आणि गणपतीची गाणी म्हणणे : असा प्रकार आढळल्यास तो थांबवायला हवा. आरती ही भावपूर्ण आणि सुरात म्हणायला हवी.
६. मुलांनो, गणपतीचे विडंबन करणारी कृत्ये करू नका !
६ अ. गणपतीचे चित्र असलेले टी-शर्ट घालणे : जिथे देवतेचे चित्र असते, तिथे ती देवता असते. टी- शर्टवर गणपतीचे चित्र असणे, हे त्याचे विडंबन आहे. टी-शर्ट धुतांना आपण त्याचा गोळा करतो. तसेच तो कसाही ठेवतो. त्यामुळे हा प्रकार म्हणजे गणपतीचे विडंबन आहे. आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगूया आणि हे विडंबन बंद करूया.
६ आ. चित्रकलेच्या नावाखाली कोणत्याही रूपात गणपति काढणे : विद्यार्थी मित्रांनो, गणपति कोणत्याही रूपात रेखाटणे, ही कला नव्हे, तर पाप आहे. कार्टून रूपात, तसेच कोणत्याही रूपात गणपति रेखाटणे, हे विडंबन आहे. आपण आपल्या आई-वडिलांची चित्रे कोणत्याही रूपात काढू का, नाही ना ? गणपति हे तर आपले आराध्य दैवत आहे. तोच आम्हाला बुद्धी देतो. मग आपल्या देवतेला असे रेखाटण्याने आपल्यावर अवकृपा होईल.
६ इ. लिखाणाच्या पष्टीपत्रावर (पॅडवर) गणपतीचे चित्र असणे : आजकाल मुले परीक्षेला जातांना लिखाण करण्यासाठी जे पुष्टीपत्र (पॅड) वापरतात, त्यावर गणपतीचे चित्र असते. त्यावर उत्तरपत्रिका (पेपर) ठेवतात आणि लिखाण करतात, हे विडंबन आहे.
मुलांनो, आपण हे गणेशोत्सवातील गैरप्रकार बंद करूया आणि गणपतीची कृपा संपादन करूया.
– श्री. राजेंद्र पावसकरगुरुजी, पनवेल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात