१. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आणि देवतांविषयी विनोद सांगून त्यांचा अनादर
अन् विडंबन करतांना दिसणे आणि त्याला त्यांचे पालक अन् अन्य हिंदूंनी प्रोत्साहन देणे
एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. त्यांच्या पालकांनीच त्यांना सिद्ध करून आणलेले होते. या स्पर्धेत देवतांची वेशभूषा केलेली ही लहान मुले ध्वनीक्षेपकासमोर येऊन विनोद सांगत होती. नकला करत होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या गणेशाची आणि अन्य देवतांची कृपा संपादन करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात होता, त्या देवतांविषयीच अनादराने विडंबनात्मक बोलले जात होते. मुलांनी सांगितलेल्या विडंबनात्मक विनोदांपैकी दोन उदाहरणे पुढे देत आहे.
अ. एका मुलाने म्हटले, “जय काली मां !” तेव्हा काली मां प्रकट होऊन म्हणाली, “तुझी आई काळी असेल ! मी तर ‘फेअर अॅण्ड लव्हली’ (गोरेपणा वाढवण्याची क्रीम) लावते.
आ. एकदा पार्वतीला शिवाच्या हातात त्रिशूळ दिसला नाही; म्हणून तिने शिवाला विचारले, “तुमचा त्रिशूळ कुठे आहे ?” शिवाने सांगितले, “गणेश घेऊन गेला आहे.” तेवढ्यात गणपति येतो. त्याला पार्वती विचारते, “तू त्रिशूळ घेऊन का गेला होतास ?” तेव्हा गणेश सांगतो, “आज प्रसादात चाऊमीन (एक चायनीज पदार्थ) ठेवला होता. तो खाण्यासाठी मी त्रिशूळ घेऊन गेलो होतो.”
अशा प्रकारे मुले देवतांचा अनादर करणारे विनोद सांगत होती आणि त्यांचे पालक अन् उपस्थित अन्य हिंदू टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देत होते. सर्वांत शेवटी या सर्व मुलांना चित्रपटाच्या गाण्यावर नाचण्यास सांगण्यात आले.
२. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे पाल्यांना सुसंस्कारित करण्यास असमर्थ असणारे हिंदू पालक !
हे सर्व पाहून मनात आले, ‘धर्माचा अभिमान जोपासण्याच्या हेतूने येथील हिंदूंनी इकडे गणेशोत्सवाची प्रथा नसतांनाही हा उत्सव चालू केला खरा; परंतु धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’ हेच हिंदूंना ठाऊक नाही आणि ते सांगणारेही कुणी उरलेले नाही. उद्देश चांगला असला, तरी दिशा चुकीची असल्यास आपण योग्य कृती करू शकत नाही. त्याप्रमाणे धर्मशिक्षणाच्या अभावी आपण स्वतःही धर्मपालन आणि धर्माचरण करू शकत नाही अन् पुढच्या पिढीलाही त्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही. यावरूनच स्वतः धर्मशिक्षित होण्याचे आणि समाजातही धर्मशिक्षण देऊन धर्मजागृती करण्याचे महत्त्व लक्षात आले.
पालकांनो, आपल्या पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी केवळ उत्सवात सहभागी करणे नव्हे, तर धर्माचे शास्त्रशुद्ध ज्ञान देणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या !‘
– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.