सांदीपनिऋषी यांच्या जयंतीनिमित्ताने …
महर्षि सांदीपनिऋषी यांचे तपस्थान
आश्रमातील बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मूर्ती
बेलपत्रात प्रकट झालेले सर्वेश्वर महादेवाचे शिवलिंग. या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:॥
अर्थ : गुरु स्वत:च ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर आहेत. तेच परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.
जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया.
मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे असलेल्या सांदीपनिऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने ६४ दिवस राहून १६ विद्या आणि६४ कला ग्रहण केल्या, असे सांगितले जाते. ४ दिवसांत ४ वेद, ६ दिवसांत ६ शास्त्रे, १६ दिवसांत १६ विद्या, १८ दिवसांत १८ पुराणे, २० दिवसांत गीतेचे ज्ञान, गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा, हे सर्व मिळून ६४ दिवसांत पूर्ण केले होते. सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण, सुदामा, बलराम आणि सांदीपनिऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या जागेला मंदिराचे स्वरूप दिले आहे.
भगवान श्रीकृष्णाने उज्जैनमधील सांदीपनिऋषींचा आश्रमच अध्ययनासाठी का निवडला ? तेे काशीला का गेले नाहीत, याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. काशी येथे जरासंधाचे राज्य होते आणि जरासंध कंसाचा मित्र होता. त्यामुळे त्या ठिकाणी सतत संघर्ष झाला असता.
सांदीपनिऋषी हे त्यांच्या ७ पुत्रांच्या वियोगाने काशी सोडून उज्जैन येथे आले होते. उज्जैन येथे त्या वेळी दुष्काळ पडला होता. सांदीपनिऋषी आता आश्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह एका झाडाखाली बसलेले तेथील लोकांनी पाहिले. त्यांच्या मुखावरील तेज पाहून ते कोणीतरी संत महात्मा आहेत, हे लोकांच्या लक्षात आले. ते दुष्काळापासून आपल्याला वाचवतील, असे त्यांना वाटले. सांदीपनिऋषींना शरण जाऊया, असे त्यांनी ठरवले.
सांदीपनिऋषी यांनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिले आणि ‘महाकाल या नावाने माझे मंदिर राहील, तोेपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही’, असे वरदान दिले. भगवान शिवाने या वेळी सांदीपनिऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितल्यावर सांदीपनिऋषी यांनी काही मागितले नाही; परंतु त्यांच्या पत्नीने मातृप्रेमापोटी त्यांचे मृत ७ पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. या वेळी शिवाने गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन, हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, कर्माचे फल तुम्हाला मिळणारच, असे सांगितले. तसेच तुम्ही येथे गुरुकुल स्थापन करा. द्वापरयुगात या गुरुकुलात शिकण्यासाठी दोन विद्यार्थी येतील. ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील. असे सांगून शिव बेलपत्रात अंतर्धान पावले. याच बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झाले. तोेच सर्वेश्वर महादेव !
या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे. या शिवपिंडीवर धानस्थ ऋषीचिन्ह आहे. या मंदिराच्या आत एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकृष्ण अध्ययनासाठी आणि शिवाच्या पूजेसाठी बसत असत. (याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे.) ही शिळा चौकोनी आहे. या मंदिराच्या बाहेरील नंदीची प्रतिमा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतापर्यंत सर्व शिवमंदिरांमध्ये नंदी बसलेल्या स्थितीत आपण पहातो; परंतु या ठिकणी नंदी उभा असलेला दिसतो.
गोमती कुंड
या ठिकाणी गोमती कुंड आहे. सांदीपनिऋषी प्रतिदिन स्नानासाठी गोमती नदीवर जात असत. ते एवढ्या लांब जात असल्याचे पाहून ११ वर्षांच्या श्रीकृष्णाने त्यांना त्यांनीच शिकवलेल्या कलेद्वारे गोमतीचे जल आश्रमाच्या ठिकाणी आणू का, असे विचारले. त्या वेळी सांदीपनीऋषींना हा ११ वर्षांचा विद्यार्थी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, हे माहिती नव्हते. श्रीकृष्णाने पुन्हापुन्हा आग्रह केल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला सांगितले की, तुला शक्य असल्यास गोमतीचे जल आण. श्रीकृष्णाने त्याच्या धनुष्यावर बाण चढवला. ते पाहून गोमती नदी थरथर कापू लागली. तिने त्या ठिकाणी येऊन श्रीकृष्णाला दर्शन दिले आणि अनेक युगे येथे रहाण्याचे आश्वासन दिले. या कुंडात सांदीपनिऋषी स्नान करत असत. (ही माहिती सांदीपनि ऋषींचे २२वे वंशज श्री. राहुल व्यास यांनी दिली.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात