वटपौर्णिमा


मुलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी
परोपकारी वृक्षांमधील गुण स्वतःत आणण्याचा निश्‍चय करूया !

बालमित्रांनो, महान हिंदु धर्म आणि संस्कृती यांनी आपल्याला उत्तुंग वारसा दिलेला आहे. आदर्श आणि आनंदी जीवन जगता येण्यासाठी, तसेच चराचरात देव आहे, याची आंतरिक जाणीव प्रत्येक जिवाला सतत रहावी, यासाठी आपल्याला ऋषीमुनींनी हिंदु धर्मशास्त्रात अनेक व्रते सांगितली आहेत. पूर्वीच्या काळी या व्रतांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रत्येक हिंदु झटत असे. त्यातून येणार्‍या विविध अनुभूतींमुळे त्याची या व्रतांवर दृढ श्रद्धा बसायची आणि चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये देवाचे अस्तित्व भरून राहिले आहे, असा भाव त्याच्यामध्ये निर्माण व्हायचा. सध्याच्या काळातसुद्धा आपण तशी श्रद्धा ठेवून आचरण केले, तर आपल्यालाही तशा प्रकारच्या अनुभूती येऊन आपल्यामध्ये भाव निर्माण होईल आणि समाजात वावरतांना आढळणार्‍या खून, बलात्कार, विध्वंस, जाळपोळ, लुटालूट अशा कोणत्याही समस्या उरणार नाहीत.

बालमित्रांनो, ज्येष्ठ पौर्णिमाहा दिवस म्हणजे वटपौर्णिमा ! या निमित्ताने आपल्याला जीवनातील नैतिक मूल्यांचे संवर्धन करून सुसंस्कारित, आदर्श आणि आनंदी जीवन कसे जगायचे ? हे शिकायचे आहे.

१. सौभाग्य अखंड रहावे, यासाठी हिंदु स्त्रियांनी वटवृक्षाचे पूजन करणे

आपण वर्षातून एकदा वटपौर्णिमा हा दिवस साजरा करतो. त्या दिवशी प्रत्येक विवाहित हिंदु स्त्री तिचे सौभाग्य अखंड टिकून रहावे, यासाठी वटवृक्षाचे पूजन करते. यातून प्रत्येक वृक्षामध्ये देव असल्याने त्याची देवाप्रमाणे पूजा करा ! असा संदेश आपल्याला ऋषीमुनींनी दिला आहे.

२. प्रत्येक वृक्षामध्ये देवाचे अस्तित्व आहे, ही जाणीव ठेवणे आवश्यक !

बालमित्रांनो, आपल्याला शाळेमध्ये पर्यावरण हा विषय शिकवला जातो. यामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा ! तसेच वृक्ष आपला मित्र आहे, असे सांगितले जाते; परंतु याची खरंच आपल्याला आंतरिक जाणीव असते का ? नाही ना ? पूर्वीच्या काळी झाडे लावा आणि झाडे जगवा, तसेच वृक्ष आपला मित्र आहे, हे आपल्या हिंदु बांधवांना सांगण्याची आवश्यकताच नसायची. तेव्हा प्रत्येक वृक्षात देव आहे, अशी सर्व हिंदूंची श्रद्धा असायची. त्यामुळे ते प्रतिदिन वृक्षांना नमस्कार करायचे. वृक्षांमुळे आम्ही जिवंत आहोत, असा कृतज्ञतेचा भाव त्यांच्या मनात असायचा.

वटपौर्णिमाच्या निमित्ताने आजपासूनच आपण प्रत्येक वृक्षामध्ये देवाचे अस्तित्व आहे, याची सतत जाणीव असू दे, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करूया.

३. पर्यावरण हा विषय केवळ परीक्षेतील गुणवृद्धीसाठी
​न अभ्यासतावृक्षांमध्ये असलेले गुण स्वत:मध्ये आणण्यासाठी अभ्यासूया !

आपल्याला शाळेत पर्यावरण हा विषय शिकवला जातो. तो का शिकवला जातो, याचा विचार आपण कधी करतो का ? सध्या शाळेतील विद्यार्थी केवळ वार्षिक परीक्षेमध्ये गुण वाढवून मिळावेत, यासाठी या विषयाचा अभ्यास करतात; पण हे योग्य आहे का ? नाही ना ! मग आजच्या वटपौर्णिच्या दिवशी आपण निश्‍चय करूया, मी केवळ परीक्षेमधील गुणवृद्धीसाठी या विषयाचा अभ्यास करणार नाही, तर प्रत्येक वृक्षात देव आहे, हे अनुभवून वृक्षांमध्ये असलेले गुण स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करीन.

४. वृक्षांमधील गुण

४ अ. परोपकारी : मित्रांनो, वृक्ष स्वतः उन्हाची तीव्रता सहन करून इतरांना सावली देतात. पावसाळ्यामध्ये पावसाचा मारा सहन करून त्याच्या छत्रछायेखाली आलेल्या सर्व जिवांचे पावसापासून रक्षण करतात. आपल्याला फळे आणि फुले देतात. यातून आपणही सतत दुसर्‍यांना साहाय्य करायला हवे, आपल्यामुळे इतरांना आनंद मिळाला पाहिजे, ही शिकवण घेऊया. दुसर्‍यांना त्रास होईल, असे वागणे, ही आपल्या धर्माची शिकवण नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

४ आ. अहंकारशून्य : वृक्षवेली आपल्याला एवढे सर्व देतात; पण त्यांच्यामध्ये मी केले, असा अहंभाव कधीच दिसत नाही. सर्व काही देवच करतो, असा त्यांचा भाव असतो. आपण मात्र थोडेसे केले, तरी मी केले, असे म्हणतो. मुलांनो, आपणही यापुढे वृक्षांप्रमाणे देवच सर्व करतो, असा भाव ठेवूया.

४ इ. दुसर्‍यांना आनंद देणे : आपण वृक्षवेलींपासून अनेक औषधे निर्माण करतो. वृक्षांपासून आपल्याला पुष्कळ आनंद मिळतो. आपणही यापुढे आपल्या प्रत्येक कृतीतून दुसर्‍यांना आनंद मिळेल, यासाठी प्रयत्न करूया.

४ ई. नत्रवायू शोषून घेऊन प्राणीमात्रांना उपयुक्त असणारा प्राणवायूउपलब्ध करून देणे : प्राणीमात्रांसाठी घातक असलेला वातावरणातील नत्रवायू वृक्ष स्वतः शोषून घेतात आणि आपल्याला उपयुक्त असणारा प्राणवायूउपलब्ध करून देतात. मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक आणि वेली या सर्वांना वृक्ष आधार देतात. आपण या सर्वांविषयी सतत कृतज्ञ असायला हवे.

मुलांनो, आता सांगा, वृक्षांत देव आहे कि नाही ?

५. आनंदी अन्आदर्श जीवन जगण्यासाठी वृक्षांप्रमाणे त्याग करायला शिका !

त्यागात आनंद आहे, असे हिंदु धर्मात म्हटले जाते. मुलांनो, वृक्ष आपल्याला त्याग करायला शिकवतात. स्वतः झिजून दुसर्‍यांना आनंद द्यायला शिकवतात. परोपकार करणे, दुसर्‍यांना साहाय्य करणे, हे सर्व गुण आपल्याला वृक्षांपासून शिकायला मिळाले; म्हणूनच वृक्षांचे पूजन करण्याची पद्धत हिंदु धर्मशास्त्रात आहे. वृक्षांमध्ये असलेले गुण आपण स्वतःमध्ये विकसित केले, तर आपण निश्‍चितच आनंदी आणि आदर्श जीवन जगू शकतो.

बालमित्रांनो, आजपासून आपण सर्वांनी वृक्षाचे सर्व गुण स्वतःमध्ये आणून स्वतःचे आणि इतरांचे जीवन आनंदमय बनवण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी आम्हाला शक्ती आणि बुद्धी दे, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही करूया.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

Leave a Comment