मकरसंक्रांत

1357797804_makar_sankranti

एक दिवस गोड बोलण्यापेक्षा प्रतिदिनच गोड बोला, असे सांगणारा ‘मकरसंक्रांत’ हा चैतन्यदायी सण !

१. वाईट बोलण्याच्या दुर्गुणरूपी दैत्याला नष्ट करण्याचा निश्‍चय करण्याची संधी देणारा सण म्हणजे मकरसंक्रांत !

     मित्रांनो, आज आपण मकरसंक्रात या सणाविषयी जाणून घेणार आहोत.

१ अ. मकरसंक्रांत या सणाचे वेगळेपण : मित्रांनो, आपण आजपर्यत पाहिले की, प्रत्येक सण हा एखाद्या तिथीला येतो; परंतु मकरसंक्रांत हा सण तिथीवाचक नाही. ज्या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते, त्या दिवशी हा सण साजरा करतात.

१ आ. दुसरे दुखावतील, असे बोलण्याचा दुर्गुण हा दैत्यच असून तो नष्ट करणे आवश्यकच ! : संक्रांतीला देवता मानले आहे. या देवतेने या दिवशी संकरासूर नावाच्या दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. यातून आपण शिकायचे की, दैत्य म्हणजे वाईटाचे प्रतीक होय. आपणसुद्धा आपल्या मनातील वाईट विचार आणि दुर्गुण यांना नष्ट करण्याचा निश्‍चय करूया ! इतरांना दुखावणारे बोलणे हाही दैत्यच आहे. याला पिटाळून लावण्याचा निश्‍चय याच दिवशी आपण करूया.

मित्रांनो, आज अनेक मुले आपल्या बोलण्यातून इतरांना दुःख देतात. उदाहरणार्थ काही मुले आपल्या आईला म्हणतात, तुला काही कळत नाही. तू वेडी आहेस. बाबांना सांगतात, तुम्हाला काय कळते ? मी तुमचे काहीच ऐकणार नाही. मित्रांना ए मांजरा, कुत्र्या, गाढवा, असे अपशब्द बोलतात. अशा बोलण्याने आपण इतरांना सतत दुःख देतो. आपण या वाईट बोलण्याच्या दुर्गुणरूपी दैत्याला नष्ट करण्याचा निश्‍चय करूया.

१ इ. आपल्या गोड बोलण्यातून इतरांना आनंद मिळणे आवश्यक ! : या दिवशी आपण सर्व जण एकमेकांना तीळगूळ देतो आणि काय म्हणतो, तर तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ! येथे गोड म्हणजे चांगले बोला. कुणाला कधी वाईट बोलू नका. तीळगूळ खाल्ल्यावर खाणार्‍याला आनंद मिळतो. तसे आपल्या गोड बोलण्यातून इतरांना आनंद मिळायला हवा. असे बोललो तरच म्हणूया, तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ! मित्रांनो, असे करूया ना ?

१ ई. केवळ मकरसंक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्यापेक्षा प्रतिदिनच गोड बोलून इतरांना आनंद द्यावा ! : मित्रांनो, आपले बोलणे प्रतिदिन इतरांना आनंद देणारे असते का ? आपण केवळ एकच दिवस गोड बोलायचे कि प्रतिदिन इतरांना आनंद होईल, असे बोलायला हवे ? मग आपण असे बोलतो का ? आज आपण पहातो की, काही मुले आपल्या आईवडिलांशीसुद्धा नीट बोलत नाहीत. मोठ्यांना उलट उत्तरे देतात. काही मुले वर्गात एकमेकांना शिव्या देतात. मग केवळ एकच दिवस गोड बोलायचे नाटक करायचे का ? प्रतिदिनच गोड, म्हणजे चांगले बोलायला हवे ना ?

१ उ. मकरसंक्रांतीपासून देवाशी बोलत आहे, या भावाने प्रत्येकाशी बोलण्याचा निश्‍चय करूया ! : मित्रांनो, या मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण सर्वानी निश्‍चय करूया की, आम्ही सर्व जण आजपासून कुणाला दुःख होईल, असे बोलणार नाही. आपल्या गोड बोलण्याने इतरांना आपलेसे करणार ! गोड बोलणे म्हणजे प्रत्येकात देव आहे आणि त्या देवाशी मी बोलत आहे, अशा भावाने बोलणे. मित्रांनो, आपल्यासमोर देव आला, तर आपण त्याच्याशी कसे बोलू ? तसेच प्रत्येक व्यक्तीत देव आहे आणि त्या देवाशी मी बोलत आहे, अशा भावाने बोलणे, म्हणजे गोड गोड बोलणे होय. मग मित्रांनो, आजच्या मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांनी असा भाव ठेवून बोलण्याचा निश्‍चय करूया !

२. आपल्या बोलण्यातून इतरांना दुःख न देण्याचा निश्‍चय करूया !

आपण खर्‍या अर्थाने मकरसक्रांत साजरी करूया ! आज मकरसंक्रांतीपासून आपण इतर दुखावतील असे न बोलता गोड गोड बोलून इतरांना आनंद देण्याचा निश्‍चय करूया ! हीच खरी मकरसंक्रात होय. मित्रांनो, आपल्या बोलण्यातून इतरांना दुःख देणे, हे पाप आहे. आपण या पापाचे भागीदार व्हायचे का ? नाही ना ? मग आजपासून पुढीलप्रमाणे वागण्या – बोलण्याचा निश्‍चय करूया आणि इतरांनाही सांगूया.

अ. आपण आईवडिलांशी उद्धटपणे न बोलता नम्रतेनेच बोलायचे.

आ. मित्रांना शिव्या द्यायच्या नाहीत.

इ. शिक्षक, दादा-ताई, वडिलधारी मंडळी आणि शेजारी यांना उलट बोलायचे नाही.

ई. इतरांच्या नावाची, वैगुण्याची वा त्रुटींची चेष्टा करून बोलायचे नाही.

उ. कुणीही दुखावले जाईल, अशी चेष्टा-मस्करी करायची नाही.

३. देवाची भक्ती वाढवण्याचा दिवस

मकरसंक्रांतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी वातावरणात देवाचे चैतन्य अधिक असते; म्हणून आपण या दिवशी कुलदेवतेचा पुष्कळ नामजप करूया. त्यामुळे आपल्याला देवाची अधिकाधिक शक्ती मिळेल. मित्रांनो, आपण देवाकडे आपल्या दुर्गुणांचा नाश करण्यासाठी शक्ती मागूया !

४. मकासंक्रातीला प्लास्टिकच्या वस्तू नव्हे, तर धर्माचे ज्ञान देणारे ग्रंथ वा सात्त्विक वस्तूच वाण देऊया !

दुसर्‍याला वाण देणे, म्हणजे दुसर्‍या व्यक्तीत असणार्‍या ईश्‍वराला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे होय. देवा, हा देह तुझा आहे. मनही तुझेच आहे आणि माझ्याकडे असलेला पैसाही तुझाच आहे, असा भाव या वाण देण्यातून आपल्यात निर्माण व्हायला हवा. त्यासाठी वाण म्हणून आपण जे देतो, ते सात्त्विक असावे. समजा आपण प्लास्टिकचा डबा दिला, तर काय लाभ होणार ? केवळ वस्तू ठेवण्यास साहाय्य होईल; पण मित्रांनो, आपण श्रीरामरक्षास्तोत्र किंवा श्री गणपति, श्री सरस्वतिदेवी इत्यादी देवतांचे लघुग्रंथ दिले, तर अनेकांना आपल्या धर्माचे ज्ञान मिळेल. त्यांची देवाविषयीची भक्ती वाढेल. असे वाण देणे देवालाही आवडेल; म्हणून मित्रांनो, आपण आपले आई आणि बाबा यांना देवाला आवडणारे वाण देण्याची विनंती करूया ! करूया ना मित्रांनो ?

५. चैतन्य देणार्‍या तिळाचा वापर करण्याचे महत्त्व

मित्रांनो, या कालावधीत थंडी असते; म्हणून या दिवसांत तिळाचे सेवन आयुर्वेदानुसार लाभदायक असते. तीळ खाल्याने आपल्यात देवतांचे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्या चैतन्यामुळे आपल्यातील दुर्गुण घालवण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. देवतांचे गुण आपल्यात येतात. तीळ हे चैतन्याचे प्रतीक आहे. आपण इतरांना तीळ देतो, म्हणजे इतरांना चैतन्य देतो. मित्रांनो, या दिवसापासून आपण आपले वागणे आणि बोलणे यांतून चैतन्य देण्याचा निश्‍चय करूया, हीच खरी मकरसंक्रात होय !

मित्रांनो या मकरसंक्रांतीला आपल्यात देवाचे गुण आणून चैतन्य वाढवूया आणि आपल्या आदर्श अन् चांगल्या बोलण्यातून मकरसंक्राती दिवशीच नव्हे, तर प्रतिदिनच इतरांना चैतन्यरूपी तीळगूळ देऊया.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

Leave a Comment