आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला ? कोणत्याही बालकाचे माता-पिता हेच त्याचे प्रथम गुरु असतात. मुलांनाही आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करायला आवडत असते; म्हणूनच सर्व पालकांनी स्वतः धर्माचरण करून आदर्श बनण्याचा प्रयत्न करायला हवा.
१. आदर्श पालकांचे गुणधर्म
मुलाला आदर्श नागरिक बनवण्यासाठी आई-वडिलांनी सतत जागरूक रहावे. आदर्श पालक होण्यासाठी लागणार्या महत्त्वाच्या गुणांचे विवेचन खाली केले आहे.
अ. निर्व्याज प्रेम
आदर्श पालकांचा प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे निर्व्याज प्रेम. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपले मूल जसे आहे, तसेच त्यांना प्रिय असते. मूल मंदबुद्धीचे असले, तरीही आदर्श पालक आपली कर्तव्ये पाळून त्या मुलावर इतर मुलांइतकेच प्रेम करतात. मुलाची वाढ आणि विकास होण्यात अशा निरपेक्ष प्रेमाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे मुलांत आत्मविश्वास निर्माण होतो. आदर्श पालक आपल्या मुलांची मने प्रेमाने आणि मनमिळाऊ वृत्तीने जिंकतात.
आ. सहवास
मुलांनी आपल्या पालकांच्या सहवासासाठी उत्सुक असणे आणि त्यांच्या सहवासात आनंदी रहाणे, हीच आदर्श पालक असण्याची खूण आहे.
इ. मुलांचे आदर्श
अभिमान वाटावा, असे पालक मुलांना हवे असतात. कर्तबगार कुटुंबप्रमुख आणि समाजातील महत्त्वाची अन् मान्यवर व्यक्ती म्हणून आपला आदर्श वडिलांनी मुलापुढे ठेवावा. एक स्त्री म्हणून पत्नी, माता, मामी, मावशी आणि काकू या निरनिराळ्या भूमिकांतून आई आपल्या मुलापुढे एक उत्तम आदर्श निर्माण करू शकते अन् त्यातून मिळणारे मानसिक समाधानही तीच मुलाच्या निदर्शनास आणू शकते.
ई. जिज्ञासू मनाला प्रोत्साहन
मुलाला आजूबाजूच्या वातावरणाविषयी कुतूहल असते. कळ (बटण) दाबल्यावर दिवा कसा लागतो ? मूल आईच्या पोटात कसे गेले ? मेल्यानंतर आजोबा कुठे गेले ? देव कुठे असतो ? इत्यादी प्रश्नांचा भडिमार तो आई-वडिलांवर करत असतो. आपल्या हातातील काम बाजूला सारून मुलाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पालकांनी द्यावे.
उ. सुप्त गुणांची जोपासना
प्रत्येक मुलात जन्मतःच काही सुप्त गुण असतात. काही मुलांना संगीताची, तर काही मुलांना चित्रकलेची आवड असते. जीवनातील खरा आनंद उपभोगण्यासाठी आणि जीवनाचे सार आकलन होण्यासाठी विविध कलांचे भांडार पालकांनी मुलांसाठी उघडे करून ठेवावे.
ऊ. बौद्धिक वाढ आणि विकास
मुलांची बौद्धिक वाढ आणि विकास होण्यासाठी, तसेच त्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी पालकांनी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
ए. मुलांना समजून घ्यावयाचा समजूतदारपणा
आदर्श पालक मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचा मुलाच्या दृष्टीने विचार करतात.
ऐ. वात्सल्य आणि कर्तव्ये
वात्सल्याच्या म्हणजेच प्रेमाच्या अभावी केवळ कर्तव्ये पाळणार्या पालकांची मुले त्यांच्यापासून दुरावतात. त्यांना पालकांविषयी प्रेम वाटत नाही. त्यांच्या मनात पालकांविषयी तिर्हाईताची भावना निर्माण होते.
ओ. वात्सल्य आणि कर्तव्य यांचा सुरेख संगम
एका सुप्रसिद्ध बालरोगतज्ञांची पत्नी स्वतःसुद्धा एक बालरोगतज्ञ होती. अत्यंत हुशार आणि नामवंत विद्यार्थिनी अन् नंतर प्राध्यापक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात काम पहात होती. पहिले मूल झाल्यावर तिने चाकरी सोडली. २० वर्षांनंतर पुन्हा त्याच महाविद्यालयात ती कनिष्ठ पदावर रुजू झाली. जर तिने आधी चाकरी सोडली नसती, तर ती तिथे विभागप्रमुख झाली असती. ‘राजीनामा देऊन आपल्या यशस्वी कारकिर्दीचा नाश तिने का केला’, असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, ‘‘राजीनामा दिला नसता, तर माझे भवितव्य उज्ज्वल झाले असते; पण राजीनामा देऊन मी माझ्या चार मुलांचे भवितव्य घडवले, याचा याही क्षणाला मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे.’’
औ. आदर्श नागरिक
कालांतराने आदर्श नागरिक बनून समाजासाठी आपली कर्तव्ये पाळणे आवश्यक आहे. हे आई-वडिलांनी आपल्या स्वतःच्या वागणुकीद्वारे मुलाच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. आपली सर्व कर्तव्ये पार पाडतांना मुलांशी प्रेमाने, चतुरपणे आणि प्रसंगी कठोरपणे वागणेही आवश्यक असते.
अं. आदर्श माता-पिता
माता आणि पिता या शब्दांची व्युत्पत्ती अर्थपूर्ण आहे. माता – ‘मां तारयति इति माता ।’ मां • मला, तारयति • तारते म्हणजे रक्षण करते, ती माता. संकटे, वाईट संगत आणि वाईट विचार यांपासून आपले संरक्षण करून आपल्याला संसारसागर तरून जाण्यास मार्गदर्शन करते, ती माता. पिता – पीयते तुरियान् । समाधीतील तुर्यावस्थेचा अनुभव जो देऊ शकतो, तो पिता. दुसरी व्युत्पत्ती – ‘पित¸न् तारयति ।’ जो स्वतःलाच नव्हे, तर पितरांनाही जन्ममृत्यूच्या फेर्यांतून सोडवतो, तो पिता.
२. याउलट कर्तव्याच्या अभावी आंधळ्या मायेने मुलाचा सर्वनाश कसा होतो,
हे पुढील गोष्टीवरून लक्षात येईल
एका अट्टल चोराला न्यायाधीश त्याचे हात तोडण्याची शिक्षा देतात. शिक्षेपूर्वी आईला काहीतरी गुपित सांगण्याच्या निमित्ताने चोर आईच्या कानाजवळ जाऊन तिच्या कानाचा इतका कडकडून चावा घेतो की, आईच्या कानाचा तुकडा पडतो. आश्चर्यचकित होऊन न्यायाधिशाने विचारले, ‘‘तू आपल्या आईशी इतक्या निर्दयतेने का वागलास ?’’ चोराने उत्तर दिले, ‘‘आईने लहानपणी मायेपोटी माझे अपराध आणि लहानसहान चोर्या पाठीशी न घालता मला कडक शिक्षा दिली असती, तर आज माझ्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी आली नसती.’’
जर आपण आदर्श माता-पिता झालो, तर मूलही पुंडलिकाप्रमाणे आदर्श होईल. जर प्रत्येक मूल आदर्श नागरिक बनले, तर शक्ती, प्रगती, शांतता आणि सुख यांनी सुसज्ज अशा पृथ्वीवर स्वर्गच अवतरेल !
संदर्भ : ‘संस्कार हीच साधना’, लेखक : डॉ. वसंत बा. आठवले, एम्. डी., डी. सी. एच्., एफ्. ए. एम्. एस्., वैद्याचार्य आणि डॉ. कमलेश व. आठवले एम्. डी., डी. एन्. बी., एफ्. ए. एम्. एन्. एस्.