१. सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे
भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. या संस्कारांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
१. बीजदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
२. गर्भदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
३. पूर्वजन्मांतील दुष्कृत्यांमुळे देव आणि पितर यांचे काही शाप असल्यास, त्यांची बाधा अल्प करण्यासाठी, देव अन् पितर यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि कुलदेवता, इष्टदेवता, मातृदेवता, प्रजापति, विष्णु, इंद्र, वरुण, अष्टदिव्पाल, सवितादेवता, अग्निदेवता इत्यादी देवतांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संस्कार केले जातात.
४. मुलगा आरोग्यवान, बलवान आणि आयुष्यमान होण्यासाठी संस्कार करतात.
५. मूल बुद्धीवान, सदाचारी, धर्माप्रमाणे आचरण करणारा होण्यासाठी संस्कार करतात.
६. आपल्या सत्कृत्याने आणि धर्मपरायण वृत्तीने आत्मोन्नती करून आपल्या वंशाच्या पूर्वीच्या बारा अन् पुढील बारा पिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता मुलात येण्यासाठी संस्कार करावेत.
७. स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून ब्रह्मलोकाची प्राप्ती किंवा मोक्ष मिळवण्याची क्षमता येण्यासाठी संस्कार करावेत.
८. सनातन धर्माप्रमाणे प्रत्येकाची प्रत्येक कृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संस्कारसुद्धा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी असतो; कारण परमेश्वराची कृपा असल्यासच आपली उद्दिष्टे पुरी होऊ शकतात.
हे सर्व संस्कार मुलाच्या आई-वडिलांनीआणि गुरूंनी करावयाचे असतात.
२. द्रव्यावरील आयुर्वेदातील संस्कार
कोणत्याही द्रव्यावर त्याचे गुण पालटण्यासाठी, म्हणजेच वाईट गुण आणि त्यांचे शरिरावरील कार्य अल्प किंवा नाहीसे करून चांगले गुण अन् कार्य वाढवण्यासाठी करावयाची जी क्रिया, तिलाच ‘संस्कार’ असे म्हणतात.
‘संस्कारो हि गुणान्तराधानं उच्यते ।’
– चरक सूत्रस्थान २६-३४
|
संस्कार म्हणजे पवित्रता, शुद्धता, स्वच्छता. अन्न शिजवल्यामुळे (अग्नीसंस्कारामुळे) पचवता येते. औषध खाल्ल्यामुळे सूक्ष्म होते आणि अधिक गुणवान होते. मर्दनं गुणवर्धनम् ।
जमालगोटा (जयपाळ) हे एक रेचक औषध आहे. त्याला इंग्रजी भाषेत ‘क्रॉटन पॉलिअॅन्ड्रम’, असे म्हणतात. रेच होत असतांना पोटांत मुरडा होतो. जयपाळ लिंबाच्या रसातून खाल्ल्यास मुरडा होत नाही. याला संस्कार असे म्हणतात.
३. जड वस्तूंवरील संस्कार
दगडातून मूर्ती बनवण्यासाठी शिल्पकाराला दगडावर हातोडा मारून दगडाचा नको असलेला भाग काढून टाकावा लागतो आणि नंतर छिन्नीने कोरीव काम करावे लागते. असे आघात सहन करूनच, म्हणजे संस्कार होऊनच दगडाला देवत्व प्राप्त होते. याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे पूर्वी मनुष्ययोनीत अनेक वेळा जन्म झाले असतांनाही त्याला परत शिकवावे लागते आणि त्याच्यावर संस्कार करावे लागतात.
एखादा माणूस जन्मापासून अरण्यात राहिला आणि माणसांच्या संपर्कात आलाच नाही, तर तो कधीच बोलू शकणार नाही. घरातील माणसांचे बोलणे ऐकून आणि त्यातील भाव समजून मूल हळूहळू बोलायला शिकते. पूर्वीच्या जन्मात तीच भाषा असेल, असेही नाही. भाषा नवीन असल्यास मनालाही भाषेचा अभ्यास करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे. तीच भाषा असली, तरी भाषेतही पालट होत असतात. ६०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा आज पुष्कळ पालटलेली आहे.
मनाची अभिव्यक्ती मानवी मेंदू आणि शरिरातून होत असल्याने देहाच्या कृती अन् कौशल्यासह मनाचे विचार आणि कुशलता अधिकाधिक व्यक्त होतात.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे बाहेरच्या उपकरणांत, तंत्रात आणि सुविधांमध्ये विशेषतः गेल्या शतकात पुष्कळ पालट झाला आहे. ६०० वर्षांपूर्वी जन्म झालेल्या माणसाचा आता परत जन्म झाल्यास दूरचित्रवाणी, विमान, संगणक इत्यादी पाहून आपण स्वर्गात जन्म घेतला आहे कि काय, असे वाटेल आणि याविषयाची माहिती, त्यांचे तंत्र अन् त्याविषयीचे शिक्षण घ्यावे लागेल. अध्यात्मशास्त्र परिपूर्ण असले आणि त्यात काही पालट झालेला नसला, तरी अध्यात्मशास्त्र समजण्यासाठी त्याला विज्ञानाच्या शोधाचा पुष्कळ उपयोग होईल. तसेच अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी पूर्वीची उदाहरणे न देता आधुनिक उदाहरणे द्यावी लागतील. नवीन देहासह मनालाही चालायला, बोलायला शिकावे लागते. समजा ज्या घरात जन्म झाला आहे, त्या घरातील माणसांना बोलतांना शिव्या द्यायची सवय असेल, तर तो मुलगा शिव्या द्यायला शिकेल. जेथे नामस्मरण, भजन, कीर्तन चालू असते, अशा घरात जन्म झाल्यास त्याला नामजप करण्याची सवय लागेल आणि त्याच्यावर चांगले संस्कार होतील.
त्यासह पूर्वजन्मीचे शिक्षण आणि संस्कार यांचाही या जन्मी लाभ होत असतो, उदा. पूर्वीच्या जन्मी एखादा माणूस संगीतज्ञ असेल, तर या जन्मी संगीत शिकतांना त्याची फार थोड्या वेळात विलक्षण प्रगती होईल. पूर्वीच्या जन्मात अध्यात्मशास्त्रात पारंगत असल्यास या जन्मात त्याला पहिल्यापासून अध्यात्मशास्त्राची आवड असेल. आदि शंकराचार्य वयाच्या ८ व्या वर्षी वेद शिकवत असत आणि त्यांचा अर्थ समजावून सांगत असत. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.
या जन्मात सिद्धावस्थेस न पोहोचलेला योगी किंवा साधक मृत्यूनंतर सात्त्विक किंवा ऐश्वर्यवान माणसांच्या घरी जन्म घेतो. सर्वसाधारणपणे बर्याच संतांचे जन्म आध्यात्मिक वातावरण असलेल्या घराण्यात झालेले आहेत.
घरात दारू किंवा सिगारेटचे व्यसन असलेली माणसे असतील, तर पूर्वी दारू किंवा सिगारेटचे व्यसन असलेला जीव त्या घरात जन्म घेईल. याउलट घरात सात्त्विक वातावरण असेल, तर एखादा पुण्यात्मा अशा घरी जन्म घेईल; म्हणून आपली मुले चांगली व्हावीत, असे वाटत असेल, तर आपण सात्त्विक आहार-विहार, आचार आणि विचार करण्यास शिकले पाहिजे अन् आपण स्वतः सात्त्विक प्रवृत्तीचे व्हावयास हवे.