“आपल्या अद्वितीय पराक्रमाने “रायाच्या नावे येथे सर्व गर्भगळीत होतात’ असा दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, “देवदत्त सेनानी” असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे,”
थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८,१७००- एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.वेगवान हालचाल हा यांच्या युदध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता.यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया यांनी जिंकल्या.जेव्हा छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्या समोर हतबल झाले, तेव्हा गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजिरावांना गुप्त पत्र लिहिले.अर्थात बाजिरावांनी तेथेही आपल्या तलवारीची कीर्ती कायम ठेवली.त्याची परतफ़ेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३ लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भुभाग त्यांनी बाजीरावांना नजर केला.शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी “मस्तानी” त्यांना दिली.
बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे.
वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको. हीच त्याची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी (Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे – “The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility”. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.
चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच “वज्रेश्वरी” देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.