दादाभाई नौरोजी




४ सप्टेंबर, १८२५ रोजी दादाभाई नौरोजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेच्या शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात. ‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली कन्याशाळा सुरू केली. ‘रास्त गोफ्तार’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला होता. १८५५ मध्ये ते एका खाजगी कंपनीच्या कामाच्या निमित्ताने इंग्लंडला गेले. पुढील काळात तेथे त्यांनी ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. भारतात परतल्यावर १८७५ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य झाले. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी काम केले. तिच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय (हिन्दी) सदस्य बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता. तसेच रॉयल कमिशनचे पहिले हिन्दी सदस्य होण्याचा मानही त्यांनाच प्राप्त झाला होता. दिनांक ३० जून, १९१७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.